Pimpri: झोपडपट्ट्यांमध्ये झपाट्याने रुग्णवाढ; जुलैअखेरपर्यंत दहा हजार रुग्ण होण्याची शक्यता – आयुक्त श्रावण हर्डीकर

Rapid growth in slums; Ten thousand patients expected by the end of July - Commissioner Shravan Hardikar

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडट्टयांमध्ये कोरोनाचे  रुग्ण वाढत आहेत. पाच झोपडपट्यांमध्ये 30 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. शहरातील जवळपास 1400 रुग्ण झोपडपट्टयांतीलच आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या 14 दिवस लागत आहेत. हाच रेट कायम राहिला तर जुलै अखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या दहा हजारांचा आकडा गाठेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामध्ये तीन ते साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण असतील. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  55 ते 60 टक्के राहील, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढत आहेत.

शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. मागील काही दिवसात शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जुनअखेरपर्यंत तीन हजारापर्यंत रुग्ण होतील हा आयुक्तांचा अंदाज खरा होताना दिसून येत आहे. आजमितीला शहरातील रुग्णसंख्या 2274 वर जाऊन पोहोचली आहे.

त्यापार्श्वभुमीवर बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठीचा कालावधी 15 दिवसांचा राहिला. तर, जुलैअखेरपर्यंत साडेदहा हजार रुग्ण होतील.

आता 14 दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. हा रेट राहिला. तर, दहा हजारापर्यंत रुग्ण वाढ होईल. ‘कंटेन्मेंट इम्प्रुव्ह’ झाले. तर, सात ते साडेसात हजारांपर्यंत रुग्ण वाढ होईल.

कदाचित रुग्णवाढ दुप्पट होण्याचा वेग 14 दिवसांचाच राहिला. तर, 18 जुलैलाच 8 हजारापर्यंत रुग्ण वाढ होईल. ‘कंटेन’ केले नाही. तर दहा हजारपर्यंत रुग्णवाढ होवू शकते.

पण, सक्रिय रुग्णांची संख्या कमी असेल. तीन ते साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण असतील. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. 55 ते 60 टक्के त्याचे प्रमाण आहे.

सर्वाधिक रुग्णवाढ पिंपरी भागातील जुन्या झोपडपट्यांमध्ये होत आहे. दापोडी, नेहरुनगर, विठ्ठलनगर, भाटनगर, बौद्धनगर, आनंदनगर, साईबाबानगर, अजंठानगर या भागातील मागील दोन दिवसातील रुग्ण वाढ आहे. मिलिंदनगर, वेतळनगरमध्येही रुग्ण सापडले आहेत.

पण, मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला नाही. विठ्ठलनगरमध्ये एका इमारतीत जास्त रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसात रुग्णांचा आकडा 45 वर गेला आहे. अजंठानगरमध्ये 200, आनंदनगरमध्येही 200 हून अधिक रुग्ण सापडले आहेत.

शहरातील पाच झोपडपट्यांमध्ये 30 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. जवळपास 1400 रुग्ण झोपडपट्यांतील आहेत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

महापालिकेने तपासण्याही वाढविल्या आहेत. दिवसाला 550 ते 600 तपासण्या करत आहोत. त्यामुळेही रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे. एनआयव्ही, नारी, आयसीएमआर, आयसर, हायरोकेअर, कृष्णा,  मेट्रो पोलीस, आदित्य बिर्ला आणि डॉ.डी.वाय.पाटील मधील लॅबकडे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.