Pimpri : रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेचा राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गरीब, गरजू रुग्णांची सर्वतोपरी ( Pimpri ) सेवा करणा-या रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेचा राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या निवडलेल्या दहा संस्थांमध्ये रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेची निवड करण्यात आली. संस्थेच्या वतीने एम ए हुसेन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी यांच्यासाठी समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभागामार्फत सन्मान केला जातो. या पुरस्काराची सुरुवात सन 1971-72 पासून झाली आहे. दरवर्षी 51  व्यक्ती आणि 10 संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.

मार्च 2024 मध्ये राज्य शासनाने मागील चार वर्षांच्या पुरस्कारांसाठी पुरस्कारार्थी व्यक्ती आणि ( Pimpri ) संस्थांची निवड केली. सन 2019- 20 या वर्षासाठी पालघर, पुणे, कोल्हापूर, जळगाव, लातूर, नांदेड, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर येथील दहा संस्थांची निवड करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातून रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेची निवड करण्यात आली.

हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. 12 ) मुंबई येथे पार पडला. 25  हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेविषयी

रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेची स्थापना एम ए हुसेन यांनी केली. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांची सेवा केली जाते. गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत करणे, जेवण पुरवणे, उपचारानंतर त्यांना घरी पोहोचवणे अशी सेवा केली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी येथे सावली निवारा केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात सुमारे ७० व्यक्ती असून त्यांची सेवा देखील रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेच्या माध्यमातून केली जाते. संस्थेचे मार्गदर्शक महादेव बोत्रे आहेत. संस्थेला आजवर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी केले होते कौतुक

दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी एम ए हुसेन यांच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतुक केले होते. रिअल लाईफ रिअल पिपल फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब, गरजू रुग्णांची मोफत सेवेचा उपक्रम राबवला जात आहे. आपण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपली स्वतःची आर्थिक स्थिती बेताची असताना निराधारांना आधार देणे, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे, गरीब रुग्णांची सेवा करणे, त्यांना जेवण देणे, उपचारानंतर त्यांना घरी पाठवणे अशी कामे करत आहात, हे कौतुकास्पद असल्याचे आर आर पाटील यांनी म्हटले ( Pimpri ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.