Pimpri: ऑनलाईन निबंध स्पर्धेत श्वेता गमरे प्रथम, अजित उजगरे द्वितीय तर, निखिल दुधडे याचा तृतीय क्रमांक

एमपीसी न्यूज – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेत मुंबई विद्यापीठात कला शाखेत शिक्षण घेणा-या श्वेता गमरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, पुण्याचे अजित उजगरे व निखिल दुधडे यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले.

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये या खुल्या निबंध स्पर्धेचे ऑनलाईन निकाल आज (गुरुवारी) जाहीर करण्यात आले. प्रथमच ऑनलाईन खुल्या पद्धतीने घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, औरंगाबादसह इतर जिल्ह्यांमधून पीडीएफ स्वरूपात निबंध प्राप्त झाले होते. आठशे ते हजार शब्द मर्यादेपर्यंत ऑनलाईन पीडीएफच्या माध्यमातून हे निबंध स्वीकारण्यात आले होते.

10 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान “कोरोना: मोबाईल मीडिया आणि आपली सामाजिक जबाबदारी” या वर्तमान परिस्थितीशी सुसंगत असलेल्या विषयावर निबंध स्वीकारण्यात आले होते. प्रथमच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पारितोषिक जाहीर करण्याचा कार्यक्रम देखील ऑनलाईन स्वरूपातच आयोजित करण्यात आला होता. यामध्ये स्पर्धेचे मुख्य परीक्षक प्रा. डॉ. संजय मेस्त्री आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी पारितोषिक पुरस्कृत केली होती असे देवेंद्र तायडे हे ऑनलाइन उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

भारतीय संविधान पुस्तिका, तीन हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेले प्रथम पारितोषिक मुंबई विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारी श्वेता गमरे हिला मिळाले. तर, संविधान पुस्तिका, दोन हजार रुपये रक्कम आणि प्रमाणपत्र, संविधान पुस्तिका, एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेले द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे अजित उजगरे व निखिल दुधडे यांना जाहीर झाले.

यावेळी डॉ. मेस्त्री, तायडे यांनी आपले ऑनलाईन मनोगत व्यक्त केले. विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. सर्व स्पर्धक देखील मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन प्रदीप मस्के आणि पिंपरीतील चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण डोळस यांच्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.