Pune : महापालिका कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात उद्यापासून मास्क व रेशन देणार

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना आत व बाहेर जाता येत नसल्याने या परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने उद्यापासून घरोघरी मोफत मास्क व रेशन वितरित केले जाणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी  ही माहिती दिली.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या रेशन किटमध्ये जीवनावश्यक वस्तू अर्थात साखर, पीठ, गोडेतेल, तूरडाळ, तांदूळ, पोहे, मीठ, साबण, मिरची पावडर, चहापावडर व दुधपावडर या जीवनावश्यक वस्तूंचा रेशन किट मध्ये समावेश आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या रेशन किटची थैली परिसरातील संबंधित लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या उपस्थितीत वितरण केले जाणार आहे.  प्रतिबंधित ६९ क्षेत्रातील सुमारे ७० हजार घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात येणार असल्याचे महापौर मोहोळ आणि आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, या भागातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपययोजना करण्यात येत आहे. राज्य शासनातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना हॉटस्पॉट कमी करणे हा त्या मागचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.