Pimpri : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांमध्ये कर संकलन विभागाचा सहभाग; 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना राष्ट्रध्वज भेट देणार

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या (Pimpri) पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने महापालिकेच्या कर संकलन विभागाचे
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी 20 जूलै ते 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना राष्ट्रध्वज भेट देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 77 हजार मालमत्तांची नोंद आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 736 मालमत्ता धारकांनी 274 कोटी 34 लाख 86 हजार रूपयांचा कराचा भरणा केला आहे. विशेष म्हणजे 1 लाख 39 हजार 431 मालमत्ता धारकांनी ऑनलाइन कर भरला आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

OBC Reservation: ओबीसी आरक्षण मिळाले, महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा

या उपक्रमात प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. देशभरात एकाचवेळी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात आपलाही खारीचा सहभाग असावा या उद्देशाने महापालिकेचा कर संकलन विभाग पुढे सरसावला आहे. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.  20 जूलै ते दि. 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या (शास्त्री कर वगळून) नागरिकांना राष्ट्रध्वज भेट देण्याचा (Pimpri) अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Sharvari Dingrajkar: शर्वरी डिग्रजकर -पोफळे यांना शिवाजी विद्यापिठाकडून संगीत विषयातील पीएच.डी

याबाबत माहिती देताना कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला देशाभिमान असतोच. त्यांना देशाप्रती प्रेम व्यक्त करता यावे यासाठी देशात आजादी का अमृत महोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या देशाच्या उत्सवात महापालिकेच्या कर संकलन विभागाने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत दि. 20 जूलै ते दि. 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना 20X30 इंच या साईजमधील राष्ट्रध्वज घरांवर लावण्यासाठी भेट देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

जे मालमत्ता धारक या कालावधीत रोखीचा वा धनादेशाद्वारे भरणा करतील त्यांना कर संकलन विभागीय कार्यालयात तिथेच राष्ट्रध्वज देण्यात येईल. जे मालमत्ताधारक ऑनलाईन भरणा करणार आहेत त्यांना कर संकलन विभागाचे कर्मचारी राष्ट्रध्वज घरपोच करतील. त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी कर भरुन देशाच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.