Pimpri : प्राधिकरण भोसरीत उभारणार देशातील पहिले संविधान भवन

सदाशिव खाडे यांची माहिती : वास्तूविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू 

एमपीसी  न्यूज – भारतीय संविधानाबाबतची सखोल माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि त्याबाबतची साक्षरता वाढीस लागावी, यासाठी भोसरीत संविधान भवन उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे पेठ क्रमांक 11 मधील पाच एकर प्रशस्त जागेवर हे संविधान भवन उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या प्रकल्पासाठीच्या वास्तूविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया प्राधिकरणातर्फे सुरू करण्यात आली आहे.प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी प्रसिध्दीपत्रकातून याबाबत माहिती दिली. पत्रकात नमूद केले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला आदर्श संविधान दिले आहे. त्यामुळे विविधता असूनही आपला देश एकसंध आहे. देशाला एकसंध ठेवणे संविधानामुळे शक्य झाले आहे. अशा या संविधानाबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती होऊन प्रत्येकजण संविधान साक्षर होणे आवश्यक आहे. त्यामुळे सशक्त समाजनिर्मिती होण्यास मदत होईल. त्यामुळे देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात यावे, अशी संकल्पना पुढे आली.

खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगाताप, आमदार महेश लांडगे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी त्याबाबत सूचना केली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे संविधान भवन उभारण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 11 मधील 5 एकर जागेवर प्रशस्त संविधान भवन उभारण्यात येणार आहे.संविधानाबाबतची इत्यंभूत माहिती, संविधान निर्मितीचा इतिहास आणि त्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान याबाबत सर्वसामान्यांना या संविधान भवनाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होणार आहे. भव्य ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनीयुक्त अभ्यास केंद्र, कॉन्फरन्स रुम या संविधान भवनात असणार आहेत. धावपळीमुळे ताणतणाव वाढले आहेत. विपश्यनेमुळे त्यापासून दिलासा मिळू शकतो, असे आतापर्यंतच्या अभ्यासातून सिध्द झाल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतो. त्यामुळे या संविधान भवनात विपश्यना केंद्र (मेडिटेशन सेंटर) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना येथे विपश्यना करता येणार आहे.

संविधान भवन उभारण्याबाबत प्राधिकरणातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वास्तूविशारदासह प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पाचे नकाशे आणि अंदाजपत्रक तयार करून घेतल्यानंतर यासाठीची निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती सदाशिव खाडे यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.