Pimpri: महापालिका दहा हजार अँटी रेबीज इंजेक्शन खरेदी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयांना आवश्यक 10 हजार व्हायल अँटी रेबिज इंजेक्शन खरेदी करण्यात येणार आहेत. प्रती 283 रुपये दराने ही ‘अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन आयडी 1 मिली’ हे इंजेक्शन खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची शहरामध्ये 8 रुग्णालये आणि 28 दवाखाने आहेत. या रुग्णालय, दवाखान्यांच्या माध्यमातून महापालिका परिसर आणि परिसराबाहेरील रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. या रुग्णालय, दवाखाने यांना आवश्यक औषधे व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी उत्पादीक कंपन्या, वितरकांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या.

या ठिकाणी श्वानदंश झालेले रुग्ण आल्यास त्यांना अँटी रेबिज इंजेक्शनचे वेगवेगळे डोस दिले जातात. त्यामध्ये आयएम 1 मिली आणि आयडी 1 मिली असे डोस आहेत. त्यासाठी मेसर्स शशी एंटरप्राईजेस या एकाच निविदाधारकाची निविदा प्राप्त झाली. त्यांनी प्रती व्हायल 285 रुपये 50 पैसे अधिक जीएसटी असा लघुत्तम दर सादर केला.

या इंजेक्शनची गरज लक्षात घेता प्राप्त झालेला दर स्वीकारण्यास तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या औषधे निवड समितीने शिफारस केली. त्यानुसार शशी इंटरप्राईजेस यांना अँटी रेबिज इंजेक्शन पुरवठा करण्याचे आदेश 23 ऑगस्ट 2019 रोजी देण्यात आला. परंतू, कंपन्यांकडे इंजेक्शनच्या कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने त्यांनी इंजेक्शन पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली.

मागणीनुसार कंपनीने एकदाही पुरेशा पुरवठा केलेला नाही. वास्तविक पाहता महापालिका रुग्णालये, दवाखाने यांना दरमहा दोन ते अडीच हजार व्हाल्सची आवश्यकता असते. त्यानुसार पुरवठा होत नसल्याने वारंवार कोटेशन पद्धतीने खरेदी करावी लागत आहे. उत्पादीत कंपन्या या इंजेक्शनचा पुरवठा करत नसल्याने महापालिका रुग्णालय दवाखान्यांना आवश्यक पुरवठा होवू शकत नाही.

बाजारातही ह्या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे महापालिकेतर्फे विविध शासकीय संस्था, तसेच उत्पादक कंपन्या यांच्याकडून थेट पद्धतीने इंजेक्शन खरेदी करण्यासाठी विचारणा करण्यात आली. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असून केवळ हापकीन जीव-औषध निर्माण महामंडळातर्फे याबाबत पत्रव्यवहार करून इंजेक्शन पुरवठा करण्याची तयारी दर्शविली.

त्यांनी 231 रुपये अधिक जीएसटी असा दर प्रति व्हायल दराने पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. परंतू, त्यांना त्यासाठी आगाऊ रक्कम दिल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. तथापि, दरम्यानच्या काळात रुग्णांची गैरसोय होवू नये आणि रुग्णालयीन सेवेत अडथळा येवू नये, यासाठी स्थानिक विक्रेते चिंचवड येथील मेसर्स चेतन मेडिकल अँड जनरल स्टोअर्स यांना प्रति व्हायल 283 रुपये 50 पैसे अधिक जीएसटी या दराने पुरवठा करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन आयडी 1 मिली’ हे इंजेक्शन पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. एकूण 10 हजार व्हायल खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी 28 लाख 35 हजार रुपये खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.