Pimpri: शहरातील कोरोना बळींची संख्या दोनशे पार; आठ दिवसात 102 जणांचा मृत्यू

The number of Corona victims in the city exceeded two hundred; 102 deaths in eight days सकाळपासून मृतांमध्ये 27 रुग्णांची वाढ शहरातील 202 आणि शहराबाहेरील 50 जणांचा कोरोनाने घेतला बळी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर, दुसरीकडे कोरोना बळींची संख्याही वाढताना दिसून येत आहे. आजपर्यंत शहरातील 202 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जुलैपासून फक्त आठ दिवसात 102 जणांचा मृत्यू झाला आहे.  12 एप्रिलपासून 19 जुलैपर्यंत शहरातील तब्बल 202 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज सकाळपासून मृतांमध्ये 27 रुग्णांची वाढ झाली असल्याचे ‘डॅशबोर्ड’च्या माहितीवरुन दिसून येत आहे.

शहरातील 202 आणि शहराबाहेरील 50 अशा एकूण 252 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. मृतांमध्ये विविध आजार असलेल्या वृद्धांसह युवकांचा समावेश होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला  होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 202 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा आकडा अवघा दीड ते पावणेदोन टक्के असला. तरी, मागील काही दिवसांपासून मृत्यूमध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवसाला सात ते आठ जणांचा मृत्यू होत आहे.  11 जुलैपासून मागील आठ दिवसात शहरातील तब्बल 102 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांमध्ये चाळीच्या दरम्यानच्या रुग्णांचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध गंभीर आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे.

महापालिकेने शनिवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शहरातील 175 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 50 अशा 225 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पालिकेच्या कोरोनाचे अपडेट देणा-या ‘डॅशबोर्ड’वर आजपर्यंत शहरातील 202 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज मृत्यूच्या संख्येत 27 ने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांमध्ये आज एकाचदिवशी 27 जणांची भर पडली आहे.

इतर शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडचा मृत्यूदर सर्वात कमी आहे.  दरम्यान, पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती येण्यास विलंब होतो. त्याची माहिती आल्यानंतर अपडेट केली जाते. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

मृत्यांमध्ये विविध आजार असलेल्या रुग्णांचे अधिक प्रमाण आहे. त्यामुळे विविध आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर पूर्वीचे आजार डोकेवर काढतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.