Pimpri : उज्ज्वल भविष्य आणि समाजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी संविधानाची मूल्ये मनामनात रुजवली पाहिजेत; महापालिका आयोजित चर्चेत वक्त्यांचा सूर

एमपीसी न्यूज – समाजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी (Pimpri)भारतीय संविधान महत्वाची भूमिका बजावत असून प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाची मूल्ये मनामनात रुजवली पाहिजेत, असा सूर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘भारतीय संविधान आणि समाजकारण’ या विषयावरील महाचर्चेमध्ये उमटला.

संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने दि.26 आणि 27 नोव्हेंबर 2023 रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Pune : मित्र महोत्सवा’त रसिकांना मिळाली विविध रागरूपांची सुरेल अनुभूती

या कार्यक्रमात ‘भारतीय संविधान आणि(Pimpri) समाजकारण’ या विषयावरील महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. बालाजी जाधव, राहुल कोसंबी, प्रा. डॉ. लोकेश कांबळे, ऍड. गौरव काकडे आणि संतोष गायकवाड सहभागी झाले होते. त्यावेळी आपले मत व्यक्त करताना ते बोलत होते. या महाचर्चेत संविधानाची उद्देशिका, आर्थिक विकास आणि सामाजिक दर्जा, आरक्षण, न्याय, जातीव्यवस्था, संविधानाची मुल्ये, हरितक्रांती अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

डॉ. बालाजी जाधव म्हणाले, भारतात श्रीमंत आणि गरीबांमधील दरी मिटायला हवी. आर्थिकदृष्ट्या तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी सामाजिकदृष्ट्या तुम्ही श्रीमंत नाही. समाजाच्या डोळ्यावरील जातीभेदाचा चष्मा जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत समाजाच्या दृष्टीने तुम्ही गरीबच आहात.

जातीभेदाचा हा चष्मा उतरायला हवा, त्याशिवाय बंधुता निर्माण होणार नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही संविधानाने दिलेली मुल्ये आहेत. संविधानाच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. पण आजचे समाजातील चित्र संविधानातील मूल्यांच्या विपरीत आहे,ते बदलायला हवे.

डॉ. राहुल कोसंबी म्हणाले, आरक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास होणे गरजेचे आहे. आरक्षण हे समाजाला प्रतिनिधीत्व करण्यासाठी दिले गेले होते. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे आरक्षणाचे अवकाश संपायला लागले आहेत. त्याविरुद्ध आरक्षणाच्या लाभार्थ्यांसह मागणी करणा-यांनीही आवाज उठवला पाहिजे. समरसता हा शब्द भुलवणारा असून त्यातून केवळ दिखावा केला जात आहे. समता हाच संविधानाचा महत्वाचा पाया असून त्यातूनच भारत एकसंध राहणार आहे.

संतोष गायकवाड म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती करून आज अनेक वर्षे लोटली तरी भारतातील अनेक नागरिकांना संविधानाचे महत्व अद्याप कळालेले नाही. बराचसा समाज आजही शैक्षणिक क्षेत्रात प्रगत झालेला नाही आणि जोपर्यंत देशाचा शैक्षणिक स्तर वाढणार नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत संविधान पोहोचणे अवघड आहे. यासाठी समरसता हा महत्वाचा घटक आहे.

डॉ. लोकेश कांबळे म्हणाले, भारतीय संविधानातील मूल्ये समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपुर्ण आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी भारतीय संविधानाची पुर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. आरक्षण हा प्रतिनिधीत्वाचा मुद्दा असून त्याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे.

ऍड. गौरव काकडे म्हणाले, संविधानातील तरतुदींचा योग्य वापर शासनकर्त्यांनी करायला हवा. न्यायपालिका आपले काम चोखपणे बजावत असल्याने नागरिकांच्या हक्क अधिकारांचे रक्षण होत आहे. स्वार्थासाठी कोणताही आधार घेऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्यास समाजाने सजगपणे आपली भूमिका बजवावी.

या महाचर्चेचे सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले.

दरम्यान, संविधान दिनानिमित्त आयोजित जागर संविधानाचा हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. अशोक गायकवाड यांनी गझलगायन सादर करून रसिकांची मने जिंकली. सुप्रसिद्ध कव्वाल मुज्तबा नाझा यांनी बहारदार कव्वाली गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर गौरव संविधानाचा हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.