Pune : मित्र महोत्सवा’त रसिकांना मिळाली विविध रागरूपांची सुरेल अनुभूती

एमपीसी न्यूज – अभिजात शास्त्रीय संगीतातील विविध रागरूपांची (Pune )आणि दर्जेदार पारंपरिक रचनांची तसेच सतार, संतूरवादनाची सुरेल अनुभूती, ‘मित्र महोत्सवा’च्या माध्यमातून रसिकांनी अनुभवली.

बुजुर्गांसह युवा कलाकारांचे दमदार सादरीकरण, हे मित्र महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. मित्र फाऊंडेशन, पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ‘मित्र महोत्सवा’ला शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता कर्वेनगर येथील पंडित फार्म्स या ठिकाणी सुरवात झाली.

जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रख्यात गायिका विदुषी( Pune )अश्विनी भिडे देशपांडे यांनी सादर केलेला राग नंद आणि लोकप्रिय सतारवादक नीलाद्रीकुमार यांचा झंकारलेला राग श्री, यांनी सुरेल वातावरणनिर्मिती केली.

पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांच्या सतार वादनाने रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. नीलाद्रीकुमार यांनी आपल्या वादनाची सुरवात राग श्री ने केली. आलाप, जोड, झाला..या परंपरागत क्रमाने त्यांनी रागरूप मांडले. झपतालातील रचनाही त्यांनी सादर केली. त्यानंतर राग तिलककामोद आणि नट यांचे मिश्रण असणाऱ्या ‘तिलकनट’ मधील तीन तालातील मध्यलय रचना पेश केली. नीलाद्री यांचे द्रुत आणि अतिद्रुत लयीतील वादन दाद घेऊन गेले. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी किरवाणी काफी अशी मिश्र रचना केहरवा आणि अद्धा तालात ऐकवली. त्यांना प्रसिद्ध तबलावादक सत्यजित तळवलकर यांनी अनुरूप साथ केली.

उत्तरार्धात विदुषी अश्विनी भिडे – देशपांडे यांनी राग ‘नंद’ च्या मांडणीतून सुरेल वातावरणनिर्मिती केली. ‘ढूॅंढू बारे सैय्या ‘ (विलंबित तीनताल) आणि ‘अजहु न आये’ (द्रुत तीनताल) या पारंपरिक बंदिशीच्या माध्यमातून नंद चे रूप त्यांनी आविष्कृत केले. पाठोपाठ राग ‘नायकी कानडा’ मध्ये ‘मेरो पिया रसिया ‘ (मध्यलय रूपक) आणि द्रुत तीन तालातील ‘निकसी अलबेली ‘ या पारंपरिक रचनांनी रसिकमनांचा ठाव घेतला. राग शंकरा मधील ‘वचन लैइके मै हारी’ (पंचम सवारी 15 मात्रा) ही रचना आणि द्रुत त्रितालातील ”पिया जावो जावो’ या रचनांना रसिकांनी विशेष दाद दिली. कबीर भजनाने त्यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता केली. त्यांना भरत कामत यांनी तबल्याची, सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीवर तसेच स्वरांगी मराठे आणि श्रुती अभ्यंकर (स्वर व तानपुरा) यांनी साथसंगत केली.

ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेशकुमार यांनी मांडलेला राग बिहाग आणि गौडमल्हार तसेच युवा संतूरवादक शंतनू गोखले यांनी छेडलेला राग यमन, ही मित्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसांची वैशिष्ट्ये ठरली. मुसळधार पाऊसधारांच्या साथीने स्वरमंडपात स्वरधारा वर्षल्या.

ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे युवा शिष्य संतूरवादक शंतनू गोखले यांनी आपल्या वादनाची सुरवात राग यमनने केली. आलाप, जोड, झाला अशा पारंपरिक क्रमाने शंतनू यांनी रागरूप मांडले. रूपक तालात त्यांनी सादर केलेल्या बंदिशीने रसिकांची विशेष दाद मिळवली. त्यानंतर राग वाचस्पती मध्ये त्यांनी झपताल आणि तीनतालात रचना पेश केल्या. रसिकांच्या विनंतीला मान देत त्यांनी मिश्र पहाडी धूनही सादर केली. त्यांना सत्यजीत तळवलकर यांनी वादनाची रंगत वाढविणारी ढंगदार साथसंगत केली.

Pune : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करा- खासदार डॉ. अमोल कोल्हे

महोत्सवाची सांगता प्रसिद्ध गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने झाली. पं. व्यंकटेशकुमार यांनी राग बिहागने प्रारंभ केला. भरदार आवाजातील त्यांच्या स्वराकृतींनी मंडप भरून गेला. ‘कैसे सुख सोवे’ हा विलंबित एकताल आणि ‘बलमा रे मोरे मन की’ ही तीनतालातील बंदिश सादर केली. राग गौडमल्हार मध्ये त्यांनी ‘काहे हो हमसे प्रितम’ ही पारंपरिक बंदिश, तसेच त्रितालात ‘बलमा बहार आयी’ ही बंदिश मांडली. त्यानंतर राग कौसी कानडामध्ये ‘राजन के राजा रामचंद्र’ (विलंबित एकताल) आणि ‘काहे करत मोसे बरजोरी’ (तीनताल) या रचना त्यांनी ऐकवल्या. ‘श्याम सुंदर मदनमोहन’ (दादरा) या भैरवीने त्यांनी महोत्सवाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी अप्रतिम साथसंगत केली.

मित्र फाउंडेशनतर्फे दरवर्षी गुरुजनांचा आणि गुणिजनांचा सत्कार करण्यात येतो. मित्र महोत्सवात २६ नोव्हेंबर रोजी रविवारी ज्येष्ठ तबलावादक गुरु पं. सुरेश सामंत यांचा सत्कार तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. रुपये 25 हजार गौरव निधी, शाल श्रीफळ असे या सत्काराचे स्वरूप होते. तसेच संपूर्ण वेळ शास्त्रीय संगीत, गायन आणि वादनाचे शिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 11 हजार इतकी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच दोन कलाकारांना तबल्याचे जोड देण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.