Pimpri : दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी सर्व विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक हवे

'फोरम फॉर इनोव्हेशन अँड अॅप्लिकेशन'ची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. फोरम फॉर इनोव्हेशन अँड अॅप्लिकेशन या संस्थेने शिक्षण मंत्र्यांना एक सूचना केली आहे, त्यामध्ये सर्व विषयांचे मिळून एकच पुस्तक असावे. सहामाहीपर्यंत एक आणि त्यापुढे एक पुस्तक असायला हवे. त्या पुस्तकात सर्व विषयांचा समावेश असेल. याबाबत विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फोरम फॉर इनोव्हेशन अँड अॅप्लिकेशन या संस्थेच्या वतीने शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी शासन आणि विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी शाळेत दप्तर ठेवण्याची पद्धत सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी अन्य काही पद्धती प्रायोगिक तत्वावर सुरु आहेत.

इयत्ता चौथी ते दहावी पर्यंत साधारणपणे सहा ते आठ विषय असतात. आठ पुस्तकांचे वजन पहिले तर ते साधारणतः 1 किलो 856 ग्रॅम होते. तितक्याच वजनाच्या वह्या, पाण्याची बाटली, डबा आणि इतर वस्तू मिळून विद्यार्थ्यांचे दप्तर साधारणतः सात ते आठ किलो वजनाचे होते. सर्व पुस्तकांची किंमत 348 रुपयांच्या आसपास होते.

शाळांमध्ये दरवर्षी चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, दुसरी चाचणी परीक्षा, वार्षिक परीक्षा अशा परीक्षा घेतल्या जातात. सहामाही पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे सर्व विषयांचे मिळून एक आणि त्यापुढे एक पुस्तक तयार केले. तर पुस्तकांचे वजन साधारणतः 165 ग्रॅमने कमी होईल. पर्यायाने पुस्तकांच्या किमती देखील कमी होतील.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने या उपायावर विचार करावा, तसेच योग्य तो निर्णय घ्यावा, असे फोरम फॉर इनोव्हेशन अँड अॅप्लिकेशनचे चिन्मय कवी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.