Pimpri: आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे पिंपरी-चिंचवडवर लक्ष; उद्या धडाडणार तोफा !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.3) भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला जाणार आहे. तर, मावळातून लोकसभा लढविण्यासाठी तीव्र इच्छूक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी त्याच दिवशी आयोजित केलेल्या कामगार परिषदेत माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्याला शहराचे माजी कारभारी अजितदादा देखील उपस्थित असणार आहेत. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी औद्योगिकनगरीवर लक्ष केंद्रित केले आहे. दोघांच्या उद्या तोफा धडाडणार असून दोघेही काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपने एकेकाळी राष्ट्रवादीत असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धवस्त केला. महापालिकेवर ‘कमळ’ फुलविले. त्यानंतर आता भाजपने पिंपरी-चिंचवडर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानवर भाजपचे शनिवारी अटल संकल्प महासंमेलन होणार आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. त्याचदिवशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातून भाजप प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याने सर्वांचे मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.

तर, दुसरीकडे मावळातून लोकसभा लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शनिवारीच रहाटणीत तीन वाजता आयोजित केलेल्या कामगार परिषदेत माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून वाघेरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाला दोन दिवसांपूर्वी चार वर्ष पूर्ण झाली. तर, शरद पवार यांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. एकाचदिवशी आणि एकाचवेळी आजी-माजी मुख्यमंत्री शहरात असल्याने दोघेही काय बोलणार याची शहरवासियांना उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.