Pimpri : लॉकडाऊन ऐवजी मास्कचा वापर व सॅनिटायझर फवारणी वाढवा – प्रदीप नाईक

Use masks instead of lockdown and increase sanitizer spray - Pradip Naik

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर ती संपूर्ण इमारत किंवा तो परिसर सीलबंद करून इतर लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याऐवजी सर्व नागरिकांना मोफत मास्क वाटप करून मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी तसेच संबंधित परिसरात दररोज दोनवेळा सॅनिटायझरची फवारणी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी केली आहे. 

प्रदीप नाईक यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन पाठविले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मार्च 2020 पासून 10 जून 2020 पर्यंत केंद्र शासन व राज्य शासनाने कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले होते. केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करणे चालू केले आहे.

 

लॉकडाऊनमुळे गरीब-श्रीमंत, मध्यमवर्गीय लोक आर्थिक अडचणीत आले आहेत. या अडचणीतून बाहेर पडत असताना सर्वसामान्यांचे आर्थिक दृष्टीकोनातून आतोनात हाल होत आहेत. भारतात 70 ते 80 टक्के मध्यमवर्गीय लोक राहात आहेत. तसेच 10 ते 15 टक्के हातावर पोट असणारे लोक राहतात. या सगळ्यांचे लॉकडाऊनने भरपूर नुकसान झाले आहे, याकडे नाईक यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे काही जनता व्यवसायासाठी बाहेर पडू शकत आहे. सर्वसामान्य लोकांनी आपले दैनंदिन व्यवसाय चालू केले आहेत. दैनंदिन व्यवहार चालू असताना काही लोकांना कोरोनाची लागण होते. कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची वैद्यकीय चाचणी घेऊन त्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाते. त्याच्या घराचा परिसर अथवा बिल्डिंग सील न करता फक्त ते घर सील केले पाहिजे. संपूर्ण परिसर सील करून तुम्ही परिसरातील लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहात. आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे गदा आणण्याचा अधिकार दिलेला नाही आणि आपण त्यावर गदा आणूनही नये, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. 

 

आपल्याला एवढीच काळजी असेल तर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या माध्यमातून कोविज-19 चे मास्क तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या त्या भागातील प्रत्येक नागरिकाला द्याव्यात. तसेच तिथल्या नागरिकांनी सुद्धा त्या-त्या भागातील जनतेची ग्राऊंड लेवलला जाऊन काळजी घ्यावी. आपण आतापर्यंत जे काही स्वयंघोषित क्लस्टर कनटेन्मेंट झोन तसेच बफर झोन व कोविड 19 प्रतिबंधित झोन हे त्वरित रद्द करावेत. सर्वसामान्य जनतेचे आपण सेवक आहात, याचा विसर पडू देऊ नये. सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल, असे पाऊल आपण उचलू नये. तसेच कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सॅनिटायझरची दिवसातून दोन वेळा फवारणी करावी, अशी सूचना निवेदनात करण्यात आली आहे. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.