Pimpri: पंतप्रधानांना ‘राष्ट्रपिता’ उपमा देण्याचा निषेध, अमृता फडणवीस यांनी माफी मागावी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांची मागणी

एमपीसी न्यूज – पंतप्रधान या पदाचा प्रत्येक भारतीय नागरिकाला आदर आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “राष्ट्रपिता महात्मा गांधी” यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत त्यांनी देशातील जनतेची त्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांना राष्ट्रपिता संबोधले होते. याचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात व या देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक व थोर पुरुषांनी रात्रीचा दिवस, रक्ताचं पाणी करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

ज्यांनी अहिंसेच्या मार्गांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी नियोजन बध्दपध्दतीने पुढाकार घेऊन देश स्वातंत्र्य करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे देशवासियांच्या भावना लक्षात घेऊन व त्यांच्या भावनेचा आदर करुन ‘राष्ट्रपिता’ म्हणून महात्मा गांधी यांचे नाव देश तसेच जगाच्या स्तरावर आले.

पंतप्रधान या पदाचा प्रत्येक भारतीय नागरिकाला आदर आहे. परंतु, त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून फडणवीस यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी देशवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.