Pimpri: काय सांगताय ! मर्जीतील ठेकेदाराला काम न मिळाल्याने भाजप पदाधिका-याच्या मुलाने पळविला ‘लॅपटॉप’

What do you say ! BJP office-bearer's son snatches 'laptop' as preferred contractor can't get work

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या उद्यान विभागाची निविदा आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळाली नसल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या एका पदाधिका-याच्या मुलाने थेट उद्यान विभागाचा लॅपटॉपच पळविल्याचा प्रकार आज (बुधवारी) उघडकीस आला आहे.  

पालिका उद्यान विभागाने डिसेंबर 2019 मध्ये उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीची निविदा राबविली होती. 23 उद्यानांसाठी राबविण्यात आलेल्या निविदांपैकी चार निविदा रद्द करण्यात आल्या होत्या.

आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळावे, यासाठी सत्ताधा-यांचे दबावतंत्र सुरू होते; मात्र कोरोना साथीमुळे अचानक लॉकडाऊन जारी झाल्याने या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या.

मंगळवारी (दि. 28) दुपारी या निविदा उघडण्यास सुरुवात झाली. निविदा प्रक्रियेत सहभागी ठेकेदारांसमोर ऑनलाईन पद्धतीने काम सुरू करण्यात आले. निविदा उघडण्यास सुरुवात होताच महापालिकेतील एका पदाधिका-याचा मुलगा या ठिकाणी आला.

आपल्या ठेकेदाराला काम मिळत नसल्याचे लक्षात येताच या मुलाने थेट टेंडर लिपिकासमोरील लॅपटॉप खेचून घेतला आणि धूम ठोकली. त्यावेळी काय चालले आहे, हे कोणाच्याच लक्षात आले नाही.

‘महापालिकेच्या मुख्य इमारतीत या’ असा निरोप या मुलाने अधिका-यांना दिला आणि त्यानंतर लॅपटॉपसह संबंधित पदाधिका-याचा मुलगा महापालिकेच्या थेट तिस-या मजल्यावर पोहोचला.

दरम्यान, उद्यान विभागाचे काही कर्मचारी व अधिकारीही त्याठिकाणी पोहोचले. याठिकाणी काहीवेळ चर्चा झाल्यानंतर सर्व जण स्थापत्य उद्यान विभागामध्ये गेले. चर्चेअंती निविदा पुन्हा उघडल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला.

हा सर्व प्रकार निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या ठेकेदारांच्या लक्षात आला. यानंतर तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत निविदा पुन्हा उघडल्या जातील, असा निरोप देण्यात आला.

याबाबत  पालिकेचे उद्यान अक्षीक्षक दत्तात्रय गायकवाड म्हणाले, ”उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होती. त्यासाठी आम्ही लॅपटॉप घेऊन आलो होतो. निविदा प्रक्रिया उघडताना कोणताही गोंधळ झालेला नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.