Pimpri: महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या घरी पोहचविणार अन्न, औषधे

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने घराबाहेर जावू न शकणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या निवासस्थानी अन्न, औषधे,  इतर अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या महापालिकेच्या सारथी हेल्पनाईन 8888006666 नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या जात आहेत. लॉकडाऊन असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत आहे.

त्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने  अन्न, औषधे, इतर अत्यावश्यक सेवा सुविधा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या निवासस्थानी पोहचविण्यासाची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे.

यासाठी नागरवस्ती विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी त्यांचा 9922501255 हा मोबाईल नंबर आणि [email protected]/[email protected]. in  व  हेल्पलाईनच्या  8888006666 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी  सेवाभावी तत्वावर काम करण्याची तयारी असलेल्या अशासकीय संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.