Pimpri: पवनाथडी जत्रेमध्ये महिलांना सोयीसुविधा, सुरक्षा द्या – दत्ता साने

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने भरविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेमध्ये महिलांसाठी सोयीसुविधा, सुरक्षा देण्यात यावी. महिलांसाठी पुरेसे स्वच्छतागृह, मोठ्या आकाराचे स्टॉल, महापालिकेची सुरक्षा व पोलीस सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत म्हणून जत्रेच्या ठिकाणी रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब ठेवण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

सांगवीतील पी. ड्‌बल्यू. डी. मैदानावर पवनाथडी जत्रा 4 ते 8 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या पवनाथडी जत्रेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग असल्यामुळे महिला स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु, महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसतात. असलेली स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे पवनाथडीमध्ये आलेल्या महिलांची कुचंबणा होते. तसेच पुरेशाप्रमाणात सुरक्षा व्यवस्था नसते. त्यामुळे महिलांची छेडछाड, साखळी, पर्स हिसकावणे असे प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना आर्थिक भुर्दड बसतो. तसेच वाटप केलेले स्टॉलही छोटे असतात. त्यामुळे सदर महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गैरसोईचे होते.

पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी महिलांसाठी पुरेसे व स्वच्छ स्वच्छतागृह, पुरेसे आकाराचे स्टॉल, महापालिकेची सुरक्षा व पोलीस सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत म्हणून मनपाची रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब ठेवण्यात यावा, अशी मागणी साने यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.