Pimpri : तुमची वाहने भंगारात तर गेली नाहीत ना !

एमपीसी न्यूज –  शहरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला जातात. मात्र ती ( Pimpri ) वाहने सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान काही वाहने भंगारात तोडून विकली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे न सापडणारी वाहने भंगारात तर गेली नाहीत ना अशी शंका उपस्थित होत आहे.

दुकानांसमोर, रस्त्याच्या बाजूला, घर, सोसायट्यांचे पार्किंग, मोकळी मैदाने, दवाखान्याचे पार्किंग अशा प्रत्येक ठिकाणावरून वाहने चोरीला गेली आहेत. मागील पाच वर्षात शहरातून तब्बल 6 हजार 552 वाहने चोरीला गेली असून त्यातील अवघ्या 1 हजार 436 वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित 5 हजार 116 वाहनांच्या बाबतीत गेली कुठं घावना, अशी अवस्था वाहन मालकांची आणि पोलिसांचीही झाली आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात वाहने चोरून ती परळी येथे विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. त्यांच्याकडून 21 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच पोलिसांनी आणखी एका वाहन चोराला अटक करून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या. त्यातील एक दुचाकी त्याने एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी भंगार व्यावसायिकाला अटक करून चौकशी केली असता त्याने एक दुचाकी पूर्ण कापून तिची विल्हेवाट लावली होती. खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये दोन भंगार व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे. या व्यावसायिकांनी पाच दुचाकींची भंगारात विल्हेवाट लावली आहे.

 

Pune News : मोबाइल चोरणार्‍या चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

 

वाढत्या महागाईमुळे नवीन वाहन खरेदी करणे अनेकांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे जुने ( Pimpri ) वाहन खरेदी करण्याला सध्या अनेकजण पसंती देत आहेत. ओळखीच्या व्यक्तींकडून, गॅरेज चालकांकडून, एजंट, ऑनलाईन माध्यमातून जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. वाहने खरेदी करताना वाहनांची कंडिशन बघितली जाते. मात्र कमी पैशांमध्ये वाहन मिळत असल्याने कागदपत्रांची खातरजमा करण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. नंतर पोलीस घरी आल्यानंतर आपण खरेदी केलेले वाहन चोरीचे आहे, हे लक्षात येते. अशा प्रकारात चोरीची वाहने खरेदी करणारे नागरिक देखील पोलिसांच्या लेखी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी होतात. त्यामुळे पडताळणी न करता वाहन खरेदी करणे जोखमीचे ठरू शकते. जुने वाहन खरेदी करताना त्या वाहनांची कागदपत्रे पडताळून पहा. माहितगार व्यक्तीकडे त्याची चौकशी करा. ज्याच्या नावावर वाहन आहे, त्या मालकाशी चर्चा करा. वाहनाच्या नोंदणी क्रमांकावर नियमभंग केल्याबाबत दंड आकारला आहे का, याची खात्री करा. एखाद्याने वाहन चोरी करून ते विकत असेल तर अशा व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.

ही खबरदारी घ्या

स्टीयरिंग लॉक, क्लच लॉक, ब्रेक लॉक अशी उपकरणे वापरा
गाडी पार्क केल्यानंतर लॉक केल्याची खात्री करा
वाहनांना सेन्सर अलार्म बसवा
वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवा
महागड्या वस्तू (पैसे, दागिने, लॅपटॉप, म्युझिक सिस्टीम) वाहनांमध्ये ठेऊ नका
वाहन न चालवता अनेक दिवस एकाच ठिकाणी वाहन पार्क करू नका
वाहनाचा नंबर वाहनाच्या पुढील आणि मागील भागावर कलरने लिहा
वाहनाचा नंबर काचांवर कोरून घ्या
सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या ठिकाणी वाहने पार्क करा
सोसायटी, घराच्या पार्किंग मध्ये पुरेसा प्रकाश आणि सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, अलार्म बसवून घ्या
वाहनाचा विमा काढा

पोलीस आयुक्तांच्या सुचनेनंतर पोलीस सक्रीय
शहरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यात शहरातून जाणाऱ्या खासगी बसेसची कसून तपासणी करावी, भंगार व्यवसायांची तपासणी करावी, संशयित वाहनांची कसून तपासणी ( Pimpri ) करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानंतर शहरातील तपास पथके आणि गुन्हे शाखांनी भंगार व्यावसायिकांना रडारवर घेतले. यात पोलिसांना यश येत असून वाहन चोरीचे गुन्हे उघड होत आहेत. न सापडणारी वाहने भंगारात तर गेली नाहीत ना, या मार्गाने देखील पोलिसांनी तपास सुरु केले आहेत.

 

 

पाच वर्षातील वाहनचोरी

 

वर्ष                  चोरीला गेलेली वाहने (सापडलेली वाहने)

2018                       1433                 (334)

2019                      1291                    (246)

2020                     974                      (211)

2021                     1350                    (316)

2022                    1504                    (329)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.