Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 6183 कोटींचा अर्थसंकल्प सादर

यंदाचे बजेट एक हजार कोटीने फुगले ; यंदा कोणतीही करवाढ नाही

एमपीसी न्यूज – ‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर केला. 1391 कोटी आरंभीची शिल्लक दर्शविण्यात आली आहे. यंदाचे बजेट एक हजार कोटीने फुगले आहे. उत्पन्नवाढीचा ठोस असा एकही पर्याय यात सुचविला नाही. त्यामुळे फुगविलेले ‘स्मार्ट’ बजेट ठरले आहे. स्मार्ट सिटी, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजना या सरकारी योजनांसाठी तरतूद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, यंदा मालमत्ता कर, पाणीपट्टीत कोणतीही करवाढ करण्यात आली नाही.

सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 37 वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे.

  • सामान्य प्रशासन विभागावर 62 कोटी, शहर रचना व नियोजन 50 कोटी, सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्य 208 कोटी, वैद्यकीय 171 कोटी, आरोग्य 243 कोटी , प्राथमिक शिक्षण 192 कोटी, उद्यान व पर्यावरण 83 कोटी, इतर विभाग 494 कोटी, भांडवली खर्च 2131 कोटी आणि कर्ज निवारण व इतरसाठी 698 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रोख प्रवाह (कॅश फ्लो) संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. नवीन प्रकल्पांपेक्षा चालू कामे पुर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
मनपाच्या विकासकामासाठी 1363.74 कोटी रकमेची भरीव तरतूद ठेवण्यात आली आहे.

  • पाणीपुरवठा विशेष निधी 87.50 कोटी ठेवले आहेत. तर, पीएमपीएमएल करिता 190.82 कोटीची भरघोस तरतूद ठेवली आहे. नगररचना भू संपादनाकरिता 140 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता 2.30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छ भारत मिशनसाठी 10.38 कोटी, स्मार्ट सिटीसाठी 150 कोटी, प्रधानमंत्री आवास योजना 36.39 कोटी, अमृत योजनेकरिता 72.50 कोटी आणि नदीसुधार प्रकल्पांसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विशेष योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना या लेखाशीर्षावर 1124.72 कोटी रुपयांची तरतुद प्रस्तावित केली आहे. शहरी गरिबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक 992.64 कोटींची तरतूद केली आहे. महिलांच्या विविध योजनांसाठी 40.95 कोटींची तरतूद केली आहे. महापौर विकास निधीसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अपंग कल्याणकारी योजनेसाठी 33.14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • पुल, ग्रेडसेपरटेरची कामे पूर्ण करण्यावर भर!
    महापालिकेच्या अर्थसंकल्पात चालू असलेली प्रकल्पांची कामे करण्यावर भर देण्यात आला आहे. भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटवर व उड्डाणपुलासाठी 35.52 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक, किवळे या संपूर्ण रस्त्यासाठी 10 कोटी, बोपखेल-आळंदी या 60 मीटर रस्त्यासाठीच्या चार पॅकेजसाठी 2.5 कोटी, दापोडीतील हॅरीस पुलाच्या समांतर पुलासाठी 2 कोटी, रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता म्हणजे एचसीएमटीआर प्रकल्पासाठी 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिक फाटा वाकड बीआरटीएस रस्त्यावर रहाटणी येथे दोन समांतर समतल वितलग बांधण्यासाठी 15 कोटी, पुणे नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते च-होलीगाव महापालिका हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठी 52.63 कोटी तरतूद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर आंद्रा भामा-आसखेडकरिता 28 कोटी रुपयांची 28 कोटी, रावेत बंधारा सक्षमीकरणासाठी 5.75 कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे.

  • ‘स्मार्ट सिटी’साठी 150 कोटी!
    केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिस-या टप्प्यात शहराची निवड झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅन सिटी सोल्यूशन हे दोन घटक आहेत. त्यासाठी महापालिकेने 150 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 72.50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पवना, इंद्रायणी सुधारण्यासाठी 200 कोटी कर्ज घेणार!
पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नद्या सुधारण्यासाठी महापालिका कर्ज घेणार आहे. 200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. शहराच्या हद्दीतून पवना आणि इंद्रायणी नद्या वाहतात. शहरातून वाहत असलेले पवनेचे पात्र 18 किलोमीटर असून इंद्रायणीचे 16 किलोमीटर आहे.

  • अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये!
    # पाणीपुरवठा विशेष निधी 87.50 कोटी
    # पीएमपीएमएल करिता 190.82 कोटी
    # नगररचना भू संपादनाकरिता 140 कोटी
    # अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता 2.30 कोटी
    # स्वच्छ भारत मिशन करिता 10.38 कोटी
    # स्मार्ट सिटीसाठी 150 कोटी
    # प्रधानमंत्री आवास योजना 36.39 कोटी
    # अमृत योजनेकरिता 72.50 कोटी
    # नदीसुधार प्रकल्प 200 कोटी

क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी तरतूद!
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय- 45.23 कोटी
‘ब’क्षेत्रीय कार्यालय 20.41 कोटी
‘क’ क्षेत्रीय कार्यालय 33.91 कोटी
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय 17.51 कोटी
‘इ’ क्षेत्रीय कार्यालय 26.50 कोटी
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय 31.95 कोटी
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय 20.27 कोटी
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय 43.24 कोटी

  • अंदाजपत्रकातील विशेष वैशिष्ट्ये!
    #नदी सुधार प्रकल्प 200 कोटी (कर्ज रोखे)
    #मेट्रो प्रकल्पाकरिता ५ कोटींची तरतूद
    #आंद्रा भामा-आसखेड करिता 28 कोटी तरतूद
    #भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेप्रेटर, उड्डाणपूलासाठी 35 कोटी 52 लाख रूपयांची तरतूद
    #भोसरी पांरजरोळ चौक ते च-होली लोहगाव मनपा हद्दीपर्यंतचा विकास आराखडा विकसित करण्यासाठी 52 कोटी 36 लाख रूपयांची तरतूद.
    #बीआरटीसाठी पर्यावरणपूरक ग्रीन बसेस खरेदीसाठी 10 कोटींची तरतूद
    #रावेत बंधारा सक्षमीकरणासाठी 5 कोटी 75 लाख रूपयांची तरतूद
    #मागासवर्गीय कल्याणकारी योजना 55.85 कोटी
    #क्रीडा निधी 46.05 कोटी

निविदांना विलंब; बजटला फुगवटा!
महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे या वर्षीच्या बजटला फुगवटा निर्माण झाला आहे . गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात कचरा संकलन, आवास योजना यांसाठी सुमारे एक हजाराहून अधिक तरतूद होती . मात्र या दोन्ही कामांमध्ये प्रचंड विलंब झाला. आवास योजना दोन वर्षांपासून कागदावर आहे. तर, कचरा संकलन कामाच्या निविदेचा घोळ अद्याप संपलेला नाही. या गोंधळात या वर्षीच्या बजटला मात्र फुगवटा निर्माण झाला आहे.

महापालिकेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा मूळ 3506 आणि जेएएनयुआरम योजनांसह 5235 कोटींचा अर्थसंकल्प होता . तर, महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4620कोटी रुपयांचा आहे . यामध्ये जवळपास एक हजार कोटींचा फुगवटा आहे. उशिरा निविदा प्रक्रिया झाल्याने तरतूद खर्च न होता शिल्लक राहिली आहे. मात्र त्यामुळे अंदाजपत्रक किंवा कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.

असा येणार रुपया


असा जाणार रुपया

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.