PMC GB virtual Meeting: शिस्तीअभावी पहिल्या ऑनलाईन सभेचा खेळखंडोबा

PMC GB virtual Meeting: First online meeting fuss due to lack of discipline. एकाच वेळी अनेक नगरसेवक बोलत असल्याने गुंडाळावी लागली सभा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाईन घेण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा आज (शुक्रवारी) खेळखंडोबा झाला. एकाच वेळी अनेक नगरसेवक बोलत असल्याने गोंधळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे तातडीने सभागृह नेते धीरज घाटे यांनी तहकुबी मांडून प्रभारी महापौर सरस्वती शेंडगे यांनी सभा तहकूब केली.
शासनाच्या आदेशानुसार प्रथमच महापालिकेची ऑनलाईन  सभा घेण्यात आली. कोरोना संदर्भात आम्हाला बोलायचे आहे, मात्र चर्चा करू दिली जात नाही, त्यामुळे पुढील सभेत आम्ही प्रत्यक्षात हजर राहू, असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी दिला. सुमारे 15 ते 20 मिनिटांत ही सभा गुंडाळण्यात आली.
आज प्रत्यक्षात सभागृहात प्रभारी महापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर असे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. तर, इतर नगरसेवकांनी घरूनच ऑनलाईन सभेत सहभाग घेतला.
अशा प्रकारची सभा यशस्वी होत नसल्याचा सूर नगरसेवकांनी व्यक्त केला. त्यामुळे तातडीने ही सभा दिनांक 5 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत तहकूब करण्यात आली.
कोरोनाच्या संकटामुळे इतिहासात प्रथमच अशा प्रकारची महापालिकेची ऑनलाइन सभा झाली. या सभेबाबत प्रचंड उत्सुकता लागली होती. मात्र, ती फोल ठरली. त्यामुळे प्रत्यक्षात होत असलेली सर्वसाधारण सभाच योग्य असल्याचे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.