Pune: शाहीर अंबादास तावरे, रेश्मा परितेकर व सुरेखा पुणेकर यांना लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा सन 2017 चा लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार शाहीर अंबादास तावरे यांना, 2018 चा रेश्मा परितेकर यांना तर, 2019 चा पुरस्कार सुरेखा पुणेकर यांना जाहीर करण्यात आला, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी  दिली.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना एकबोटे उपस्थित होत्या. दिग्गज व मराठी रंगभूमीची आयुष्यभर सेवा करणाऱ्या कलावंतांचा पुणे महापालिकेतर्फे लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने सोमवारी (दि. 9 मार्च) सकाळी 11 वाजता गौरव केला जाणार आहे. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.

जेष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापालिकेतर्फे 1995 पासून लोकनाट्य व लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना वरील पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्कारार्थींना मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, गुलाबाच्या फुलांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येते. इतर पुरस्कारर्थींना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात येणार आहे.

लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने यापूर्वी अनेक दिग्गज कलावंतांना गौरविण्यात आले आहे. यामध्ये यमुनाबाई वाईकर, शाहीर साबळे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जेष्ठ तमाशा कलावंत काळू – बाळू, जेष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, मधू कांबीकर आदी मान्यवरांनाच समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.