Chakan : चाकणमध्ये दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

एमपीसी न्यूज – घरात कोणी नसताना घराचा दरवाजा आतून बंद करून घेऊन एकोणतीस वर्षीय तरुण दुकानदाराने राहत्या घरातील बेडरूममधील छतावरील पंख्याला बेडसिटच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चाकण गावच्या हद्दीतील विशाल गार्डनमध्ये बुधवारी ( दि. ४ मार्च ) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.  आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट झाले नाही.

महेंद्रसिंग गणपतसिंग देवडा ( वय – २९ वर्षे, सध्या रा. विशाल गार्डन, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. महेंद्रसिंग मोहनसिंग परमार ( वय – २७ वर्षे, सध्या रा. विशाल गार्डन, चाकण, मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, महेंद्रसिंग याचे चाकण येथील विशाल गार्डनमध्ये एक इलेक्ट्रिक मोटारचे दुकान आहे. बुधवारी ( दि. ४ ) सायंकाळी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नव्हते.  त्यावेळी त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला.  घरातील बेडरूममधील छतावरील सिलिंग पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून घेवून त्याने आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी महेंद्रसिंग देवडा हा कोठेच दिसत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. बेडरूममध्ये डोकावून पाहिले असता घरातच वरील प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाबुराव राठोड व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.