Priyanka Chopra’s Memory: प्रियांकाने दिला ब्लॅक अँड व्हाइट फोटोद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा

priyanka chopra shares her parents black and white photo on social media for memorial day

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या या काळात अनेकजण सध्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ब्लॅक अँड व्हाइट फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. पिगी चॉप्स अर्थात लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे आईवडील म्हणजे डॉ. मधू चोप्रा आणि डॉ. अशोक चोप्रा यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यात ते दोघेही सैन्याच्या गणवेशात दिसत आहेत. प्रियांकाचे आई आणि वडील दोघेही सैन्यात फिजिशियन होते.

अमेरिकन सूनबाई असलेल्या प्रियांकाने हे छायाचित्र अमेरिकेत साजऱ्या केल्या जाणाऱ्या मेमोरियल डेच्या निमित्ताने शेअर केले आहे. अमेरिकेत शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीनिमित्त ‘मेमोरियल डे’ साजरा केला जातो.

हे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, ‘माझ्या आई-वडिलांनी भारतीय सैन्यात काम केले आहे. कदाचित यामुळेच मी जगातील सर्व सैन्य कुटुंबांशी स्वत:ला जोडण्यास सक्षम आहे. आज आम्हाला त्या सर्व शहिदांची आठवण होते ज्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कधीही आपल्या जीवाची पर्वा केली नाही.’

प्रियांकाने शेअर केलेला हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो तिच्या चाहत्यांना आवडला आहे. आतापर्यंत त्याला 1.3 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.


यावर प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्राने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, ‘मोठ्या आई आणि बाबांचा सर्वोत्कृष्ट फोटो’. डिझायनर फराह खान अलीने लिहिले, ‘काय सुंदर जोडपं आहे’.

प्रियांका आपल्या वडिलांची म्हणजे डॉ. अशोक चोप्रा यांची अत्यंत लाडकी होती. त्यांचे 10 जून 2013 रोजी निधन झाले. ते 2008 पासून कर्करोगाने ग्रस्त होते. प्रियांकाने निर्मिती केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटात म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये तिने ‘बाबा’ हे भावपूर्ण गाणं स्वत: गायलं होते. त्यात तिच्या बाबांबद्दलच्या भावना दिसून आल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like