Pimpri News : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध करून द्या; माकपची मागणी

एमपीसी न्यूज – परदेशात शिक्षणासाठी जाणारे अनेक विद्यार्थी कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना परदेशात जाता येत नसून शैक्षणिक नुकसान होत आहे. परदेशात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तातडीने ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध करून द्यावी. त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतीकुमार कडुलकर यांनी केली आहे.

याबाबतीत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कडुलकर यांनी म्हटले आहे की, दरवर्षी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक विद्यार्थी इंग्लंड,अमेरिका,ओस्ट्रेलिया,युरोप,रशिया,तसेच बाल्टिक देशामध्ये उच्च शिक्षणासाठी जात असतात.

जानेवारी 2021 पासून या मुलांनी परदेशी विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली असते. पालकांनी लाखो रुपयांची शैक्षणिक कर्जे घेऊन त्यांना त्या त्या देशात पाठवण्याचे नियोजन केलेले आहे. परंतु,
परदेशात जाणारे विद्यार्थी आणि इतर नागरिक कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीकरणापासून वंचित आहेत.

सरकारने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यायला हवी होती. अनेक पालक ऑनलाइन व्हाकॅसिनेशन करण्यास असमर्थ ठरले आहेत. शहरात कोव्हीशिल्ड लस सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपलब्ध नाही. केंद्र सरकारने 18 ते 44 वय गटातील नागरिकाना ऑनलाइन हाच एकमेव पर्याय ठेवल्यामुळे परदेशी जाणार्‍या विद्यार्थी आणि इतर नागरिकांची होणारी गैरसोय स्थानिक प्रशासनाने दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. या वयोगटातील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना लस द्यावी.

लसीकरण नसल्यामुळे हे विद्यार्थी शहरात अडकून आहेत. त्यांची विमानप्रवासाची तिकिटे त्यांना बुक करता येत नाहीत.  त्यांच्या विद्यापीठात शैक्षणिक वर्ग सुरू झाले आहेत. पालक शैक्षणिक कर्जाचे हप्ते भरत आहेत.
त्यामुळे परदेशी जाणाऱ्या शहरातील विद्यार्थी आणि इतरांसाठी लसीकरणाचा विशेष कक्ष स्थापन करून कोविशिल्ड लस त्वरित उपलब्ध करावी, अशी मागणी कडुलकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.