Testing for COVID-19 : पुण्यातील तरुण स्वत:चा काहीतरी वेगळा व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने एकत्र आले आणि बनवलं कोविड सेल्फ टेस्ट किट

एमपीसी न्यूज : सध्या जगभर थैमान घालत असलेल्या करोनाच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. घरबसल्या आपली आपल्याच करोनाची चाचणी करता येईल असे टेस्ट किट पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरीज सोल्युशन्स् या कंपनीने शोधून काढलेले आहे. या किटला आयसीएमआरने मान्यता दिली असून येत्या काही दिवसातच ते बाजारात उपलब्ध होणार आहे.

कोविसेल्फ या नावाच्या या किटमार्फत आपली आपणच करोनाची स्वयंचाचणी करु शकतो. त्यात येणा-या रिपोर्टनुसार मग पुढील कार्यवाही करावी लागते. हे एक अॅप असून त्यामार्फत ही टेस्ट करता येऊ शकते. टेस्टनंतर करोना पॉझिटिव्ह येणा-या व्यक्तींना नियमांचे पालन करुन पुढील काळजी घ्यावी लागेल.

मायलॅब डिस्कव्हरीज सोल्युशन्स् ही कंपनी २०१३ साली सुरु झाली. हेल्थकेअर क्षेत्रात काम करणा-या या कंपनीचे  लोणावळा येथे प्रक्रिया उद्योग केंद्र असून बाणेर येथे संशोधन व विकास केंद्र आहे. तसेच या कंपनीचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे.

महाराष्ट्रातील काही तरुण स्वत:चा काहीतरी वेगळा व्यवसाय सुरु करायचा या उद्देशाने एकत्र आले आणि २०१३ मध्ये या छोट्याशा स्टार्टअप कंपनीची सुरुवात झाली. हसमुख रावल, शैलेंद्र कवाडे, सुजित जैन, राहुल पाटील, देवर्षी डे, गौतम वानखेडे आणि श्रीकांत पाटोळे यांनी त्यावेळी एक स्वप्न बघितले. ते पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले आणि आता त्या स्वप्नाची नेत्रदीपक पूर्तीकडे मोठ्या दिमाखात वाटचाल सुरु आहे.

कंपनीच्या वाटचालीविषयी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील यांच्याशी कंपनीच्या इतर उत्पादनांविषयी व भविष्यकालीन योजनांविषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी कोविसेल्फची निर्मिती कशी करण्यात आली आणि इतर उत्पादने कोणकोणती आहेत याची विस्तृत माहिती दिली.

प्रश्न – कोविसेल्फची निर्मिती प्रक्रिया कशी सुरु झाली?

राहुल पाटील – मागील वर्षी जेव्हा कोविडच्या साथीला सुरुवात झाली. तेव्हा आधी काहीच कल्पना नव्हती की ही साथ म्हणजे काय असू शकते. मग त्याची तीव्रता हळूहळू समजू लागली. त्यावर काम करण्यास सुरुवात झाली. आधी आरटीपीसीआर टेस्ट लॅबमध्ये करावी लागते. मग त्याचा रिपोर्ट येतो आणि मग उपचाराची पुढील दिशा ठरते. सध्या या टेस्ट करण्याची संख्या खूपच वाढलेली आहे.

त्यामुळे मग रिपोर्ट येण्यास थोडा वेळ लागतो. टेस्ट करण्यासाठी तासंतास लोक लाईनीत उभे असतात या दरम्यान जर ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असेल तर त्यांना तसे माहित नसल्याने त्या व्यक्ती समाजात वावरतात. त्यामुळे मग इतरांना लागण होण्याचे प्रमाण वाढते आणि संसर्ग पसरण्यास ही व्यक्ती कारणीभूत ठरते. अशावेळी जर चाचणीचा रिपो्र्ट लवकर आला तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीला लवकर विलगीकरणात ठेवता येते किंवा आवश्यक असेल तर लगेच उपचार सुरु करता येऊ शकतात. यासाठी ही स्वयंचाचणी खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि लवकर निदान करता यावे यासाठीच या स्वयंचाचणी किटची निर्मिती करण्यात आली.

मागील वर्षी सर्वप्रथम मायलॅबतर्फेच आरटीपीसीआर चाचणीच्या किटची भारतात निर्मिती करण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये परत करोनाची दुसरी लाट हळूहळू दिसू लागली. त्यावेळी मग आमच्या कंपनीत स्वयंचाचणी करता येईल असा किट तयार करता येऊ शकतो का याचा अभ्यास करण्यात आला. आणि आत्ता नुकतीच या स्वयंचाचणी किटला आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे. आता थोड्या कालावधीतच म्हणजे साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात हे किट भारतातील सर्व राज्यांमध्ये  उपलब्ध होतील. आता याची निर्मिती सुरु झाली आहे.

प्रश्न – कोविसेल्फ व्यतिरिक्त कंपनीची इतर कोणती विशेष उत्पादने आहेत का ?

राहुल पाटील – रक्तपेढी म्हणजेच ब्लड बँकसाठी आवश्यक असणारी टेस्ट करणारी आमची कंपनी अशियामधील प्रथम आणि जगातील तिसरी कंपनी आहे. NAT असे या टेस्टचे नाव असून रक्तपेढीमध्ये संकलित होणा-या रक्ताच्या तीन चाचण्या कराव्या लागतात. हिपॅटायटिस C,हिपॅटायटिस B आणि HIV या त्या तीन चाचण्या आहेत.

ही NAT टेस्ट आरटीपीसीआरवर आधारित असून या टेस्ट करणारे मशीन आम्ही विकसित केले असून त्यात मायलॅब अशियातील एकमेव कंपनी आहे. सध्या जगभरात यासंदर्भात विविध प्रकारच्या चाचण्या करता येतात. पण प्रगत तंत्रज्ञान वापरुन टेस्ट करणारी मायलॅब ही अशियातील पहिली कंपनी आहे हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

याशिवाय सध्या करण्यात येणा-या आरटीपीसीआर टेस्टसाठी लॅबला मोठा सेटअप लागतो. त्या सेटअपचे आकारमान कमी करुन छोट्या जागेत या टेस्ट करता येतील यासाठी Compact xL या मशीनची निर्मिती केली आहे.

जेव्हा करोनाची साथ सुरु झाली तेव्हा सगळ्यांसमोर अनेक बाबींबद्दल प्रश्नचिन्ह होते. पण पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस निर्मिती सुरु झाली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. अशीच दिलासादायक कामगिरी पुण्यातीलच मायलॅब डिस्कव्हरीज सोल्युशन कंपनीने स्वयंचाचणी किट तयार करुन केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.