Pune News : प्रा. ना. स. फरांदे यांच्या जीवनावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – समरसतेच्या आधारावर भारतीय जनता पक्षाची उभारणी करताना प्रा. ना. स. फरांदे यांनी दिलेले योगदान दीपस्तंभाप्रमाणे होते, त्यांनी मूल्याधिष्ठित राजकारण केले, त्यांचे कार्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गगार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

‘दीपस्तंभ’ या विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या जीवनावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करताना फडणवीस बोलत होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार योगेश टिळेकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत फरांदे, कार्याध्यक्षा हर्षदा फरांदे, विश्वस्त मंगला फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस पुढे म्हणाले, समरसता आणि समता यात बुद्धिभेद करण्याचे काम केले जात आहे. समता हे उद्दिष्ट आहे, तर समरसता हे त्याकडे पोहोचण्याचा मार्ग आहे. समरसतेच्या आधारावर पक्ष उभा करण्याचे आणि सर्वसमावेशकता आणण्याचे काम भाजपने केले. पक्षाचा राज्यातील चेहरा एक, मात्र त्याला निर्णयाचे कोणतेही अधिकार नाहीत, तर महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून घ्यायचे यापेक्षा वेगळी कार्यपद्धती भाजपने अंगिकारली त्यामुळे पक्षाचा सर्वच क्षेत्रांत विकास झाला.

पाटील म्हणाले, फरांदे यांनी भाजपची विचारधारा ही बहुजनांच्या हिताचीची आहे, राष्ट्राच्या कल्याणासाठीच आहे हे ठामपणे सांगण्याचे धैर्य दाखवले. भाजपवरील विशिष्ट जातींचा पक्ष हा शिक्का पुसून काढण्यासाठी फरांदे यांच्यासारख्या नेत्यांनी दाखवलेली जिद्द प्रशंसनीय होती. त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष आज यशोशिखरावर येऊन पोहोचला आहे. उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून पक्ष घडला.

पतंगे म्हणाले, मैत्री, करुणा, आनंद, उपेक्षा या मनोभावांच्या आधारे कुठलेही काम करावे हा समरसतेचा मंत्र आहे. सुरक्षा, सन्मान, सहभाग, प्रतिनिधित्व, नेतृत्व असा विचार जातीपातींचे समूह करीत असतात. राजकीय समरसतेसाठीत्या आधारे विचार करून संघर्ष करणारे, समाज उत्थानाचे दीर्घकालीन कार्य करू शकणारे नेतृत्व विकसित करण्याची गरज आहे.

जावडेकर म्हणाले, विधानपरिषदेचे सभापती असणारे जयंतराव टिळक, ना. स. फरांदे या व्यक्ती कायम लक्षात राहतील. त्यांचे सभागृहावर नियंत्रण असायचे. फरांदे सर्वांनी सर्व पक्षांचा विश्वास संपादन केला होता. त्यांनी न्यायाचे काम केले. कधीही पक्षपात केला नाही. पक्षाचा निर्णय मान्य करायचे, मराठीवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.

हर्षदा फरांदे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. अभिजीत फरांदे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.