Terrorist Attack Foiled: पुलवामासारखा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, स्फोटकांनी भरलेली कार केली नष्ट

Pulwama’s 60 kg car bomb seized by cops military crpf terrorist attack foiled

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला आहे. पुन्हा एकदा स्फोटकांनी भरलेल्या कारच्या माध्यमातून २०१९ सारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांनी डाव आखला होता. परंतु, सुरक्षादलाला याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने दहशतवाद्यांचा हा प्रयत्न फसला. सुरक्षादलाने स्फोटकांनी भरलेली कार नष्ट केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

काश्मीर पोलिसांनी आपल्या टि्वटर हँडलवर म्हटले की, योग्यवेळी मिळालेली माहिती आणि पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या प्रयत्नांमुळे कारच्या माध्यमातून आयईडी स्फोट करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.


एका पांढऱ्या रंगाच्या खासगी कारला सुरक्षादलाने एका तपासणी नाक्यावर रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने कार न थांबवता ती तशीच पुढे दामटली. त्यानंतर सुरक्षादलाने कारवर गोळीबार केला. काही वेळाने ही कार एका ठिकाणी उभी केल्याचे दिसले.

तपासणीदरम्यान कारमध्ये मोठ्याप्रमाणात आयईडीचा साठा आढळून आला. घटनास्थळी त्वरीत बॉम्बनाशक पथकाला बोलावण्यात आले. स्फोटकांनी भरलेली कार तेथून नेणे धोकादायक होते. त्यामुळे स्फोटके कारमधून बाहेरही काढता येत नव्हते. आजूबाजूची सर्व निवासस्थाने रिकामी करण्यात आली आणि स्फोटकांनी भरलेली कार उडवण्यात आली.


याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडवून देताना दिसत आहे.

जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाने हा संयुक्तरित्या डाव आखला होता, असे जम्मू-काश्मीर पोलीसचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ला सांगितले. कारमध्ये ६० किलो स्फोटके होते.


पोलिसांना रात्रीचा याबाबत माहिती मिळाली होती. हिज्बुल मुजाहिदीनचे दहशतवादी स्फोटकांनी भरलेली कार घेऊन निघाले होते. परंतु, ते कोणत्या मार्गावरुन जाणार आहेत, याची माहिती मिळू शकली नव्हती. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने सर्व संभाव्य मार्गांवर तपासणी नाके बनवले होते. संशयित कार आयखंडमध्ये दिसली. पोलिसांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला त्यानंतर पुढे जात कार सोडून पलायन केले.

2019 मध्ये पुलवामा येथे 40 जवान झाले होते शहीद

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 ला दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर धडकवून स्फोट घडवला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारताने पीओकेत घुसून एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.