Pune : सिगारेटने भरलेला कंटेनर पळवणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज – तब्बल पावणेदोन कोटींच्या सिगारेटचे बॉक्स असलेला कंटेनर पळवून नेणा-या चोरट्यांच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील कंटेनर जप्त केला असून त्यामध्ये सिगारेट्सचे 401 बॉक्स आहेत. त्याची किंमत 86 लाख 94 हजार 81 रुपये आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रांजणगाव एमआयडीसीतून सिगारेटचे बॉक्स असलेला कंटेनर अंबरनाथला निघाला होता. आठ सप्टेंबर रोजी हा कंटेनर लोणावळा येथील वरसोली टोलनाक्यावर आला असता दुचाकीवरील दोघांनी आणि कारमधील तिघांनी मिळून अडवला आणि चालकाला मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून ते कंटेनर घेऊन ते पसार झाले होते.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी नगर रोडवरील सुपा टोलनाक्यावरील आणि नांदगाव येथील पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यातील आरोपी हे सराईत असल्याची निष्पन्न झाले होते. गुन्ह्यात वापरलेल्या कारच्या क्रमांकावरून मालकाकडे विचारणा केली असता त्याने कार भाड्याने दिल्याचे सांगितले. त्यातून आरोपींची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीने पाच आरोपींना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला. सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर यापूर्वी दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत.

पुणे ग्रामीण जिल्हा अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, बालाजी गायकवाड, पोलीस हवालदार पी.एस.कांबळे, एस.ए.सावंत, एस.सी.ठोसर, जे.ए.दीक्षित, एम.ए.ठोंबरे, वाय.एच.जगताप आदींनी गुन्ह्याचा तपास केला.

"Cigret

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.