Pune Acid Leakage: चांदणी चौकाजवळ टँकरमधून मोठ्या प्रमाणात अ‍ॅसिड गळती, महामार्गावरील वाहतूक बंद

Pune Acid Leakage: Large acid spill from tanker near Chandni Chowk, traffic closed on highway

एमपीसी न्यूज – पुण्यातील चांदणी चौकाजवळ एका मोठ्या टँकरमधून अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गळती होऊन मोठ्या प्रमाणात उग्र वास आणि वाफा निर्माण झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहचले असून आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत थांबविण्यात आली आहे. 

पनवेल येथून निघालेला सुमारे 15 ते 20 हजार लिटर क्षमतेच्या अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडचा मोठा टँकर कात्रजच्या दिशेने जात असताना चांदणी चौक ओलांडून पुढे जात असताना कोथरूड वळणाजवळ टँकरला मोठे छिद्र पडून त्यातून अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची गळती सुरू झाली. हे अ‍ॅसिड बाहेर रस्त्यावर पडून घट्ट होत होतो आणि मोठ्या प्रमाणात वाफा निघत होत्या. या प्रकारामुळे परिसरात एकच घबराट पसरली.

घटनेचे वृत्त समजताच पोलीस तसेच पुणे महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीएचे अग्निशमन दल आणि देवदूतचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबवून अ‍ॅसिड गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यात आला. कंपनीचे मदत पथक पनवेलहून घटनास्थळी येण्यास निघाले आहे. ते पोहचण्यास काही तासांचा कालावधी लागणार असल्याने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्त्याच्या कडेला मोठा खड्डा घेऊन रस्त्यावर वाहणाऱ्या अ‍ॅसिडचा प्रवाह त्या खड्ड्यात वळण्याचा निर्णय घेतला.

अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडच्या गळतीमुळे निर्माण झालेल्या वाफा डुक्कर खिंडीपर्यंत पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या प्रकारामुळे कोणालाही त्रास झाल्याची माहिती अद्यापपर्यंत तरी उपलब्ध नाही.

उप मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील गिलबिले तसेच अग्निशमन केंद्र प्रमुख गजानन पाथ्रुडकर व राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या 15 जवानांनी तातडीने हालचाली करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या पथकाचे तसेच देवदूत टीमचेही त्यांना सहकार्य लाभले. रात्री उशिरापर्यंत टँकरमधून अ‍ॅसिड गळती चालूच होती. अग्निशमन दलाचे पथक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडचा उपयोग

अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडचा उपयोग सेल्युलोज अ‍ॅसिडच्या निर्मितीकरिता केला जातो. कृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता हे अ‍ॅसिड वापरले जाते.  लोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अ‍ॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरचा उपयोग करतात. शेती व्यवसायातही अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडचा उपयोग केला जातो. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.