Pune : रस्ते, पदपथावर अनधिकृतपणे शेतमाल, फळे विक्री केल्यास कारवाई : आयुक्त

Action on sale of unauthorized agricultural produce on roads, sidewalks: Commissioner :वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई होणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे रस्ते आणि पदपथावर अनधिकृतपणे शेतमाल, फळे विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशी विक्री करताना आढळण्यास वाहने आणि शेतीमालावर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करून वाहने आणि शेतीमाल जप्त करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

कोरोनाच्या संकट काळात राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुणे शहरात सर्व मंडई आणि गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार आवारातील भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरीही, काहीजण लॉकडाऊन पूर्वी रस्त्यांवर, फुटपाथवर भाजी विक्री करीत होते. ते आताही करीत आहेत.

त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. हे विक्रेते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

आयुक्तांचे आदेश मोडल्यास 10 टनांपर्यंत वाहतूक क्षमता असलेल्या हलक्या वाहनांना 20 हजार रुपये, कार – जीपला 15 हजार तर, 3 चाकी टेम्पो चालकाकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

कोरोनाच्या संकट काळात रस्त्यांवर, फुटपाथवर मिळेल त्या जागी ठाण मांडून भाजी विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला होता. त्यांच्यावर आता महापालिकेतर्फे धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याने या अनधिकृत विक्रेत्यांना आळा बसण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.