Pune : दुहेरी उड्डाणपुलास भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज – नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो आणि इतर वाहनांसाठी उभारल्या जाणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलास भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेस देण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

या उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील आठवडयात करण्यात आले आहे. विधि समिती अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे यांच्यासह मोहोळ यांचा हा प्रस्ताव आहे.

दरम्यान, कर्वे रस्त्यावर वनाज ते रामवाडी मार्गाचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर अभिनव चौक आणि नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही पूल स्वतंत्र न करता या दोन्ही मार्गांसाठी एकच उड्डाणपूल उभारला जाणार आहे. “एसएनडीटी’ ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंत सुमारे 542 मीटर लांबीचा हा पूल असणार आहे. त्यासाठी सुमारे 60 कोटींचा खर्च येणार असून त्यासाठी महापालिका 35 कोटींचा खर्च करणार असून 2018-19 च्या अंदाजपत्रकात 14 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.