Pune Breaking News : भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सकाळी पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन काकडे यांना अटक केली होती. मात्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर काकडे यांना जामीन मंजूर केला.

गुन्हेगारी टोळ्यांची संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली होती.

तळोजा तुरुंगातून सुटलेल्या गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणुक काढण्याच्या प्लॅनिंगमध्ये सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने आज आटक केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वीही काकडे यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान, रॅली प्रकरणी मारणे विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत. सध्या काकडे यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.

मारणे आणि काकडे यांच्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नेमके कोणते संबंध आहेत, मारणे याची रॅली व त्यातून दहशत निर्माण करणे या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.