Pune : आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ ( Pune) करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध कलम 353 नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दरम्यान, संबंधित कार्यक्रमास कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

 

दरम्यान, महापालिकेच्या अभियंता संघाने याप्रकरणी सोमवारी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसास मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता आमदार धंगेकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.