Pune : मिनरल वॉटरच्या नावाखाली बनवले जातंय दूषित पाणी !

दूषित पाणी उत्पादकांवर कारवाईची माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी

मिनरल वॉटरच्या नावाखाली सीलबंद बाटल्यामधून दूषित आणि गलिच्छ पाणी विकले जात असल्याचे उघडकीस आले आहे. अशा उत्पादकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या पत्रासोबत त्यांनी काही मिनरल वॉटरच्या बाटलीचे फोटो जोडले आहेत. या सिलबंद बाटलीतील पाण्यात शेवाळे तरंगताना स्पष्ट दिसत आहे.

या पत्रामध्ये विजय कुंभार यांनी म्हटले आहे की, सध्याच्या उन्हाळ्यात आणि एरवी अशा पाण्याच्या सिलबंद बाटल्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. हे पाणी प्यायल्याने मोठ्या प्रमाणावर आजार पसरण्याची शक्यता असते. सोबतच्या फोटोमधील सिलबंद बाटलीतील पाण्यात शेवाळे तरंगताना स्पष्ट दिसत आहे. ही बाटली पिंपरी चिंचवड परिसरात खरेदी करण्यात आली असून ती पुण्यातील चिखली भागात बनवण्यात आल्याचे दिसत आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचा मार्ग अवघड आहे. त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतलेले नमूने लागतात व माल खरेदी केल्याची रितसर पावती लागते. खरेतर अशा छोट्या वस्तूंची पावती कुणी देत नाही आणि दिलीच तर त्यावर त्या पदार्थाचा बॅच नंबर किंवा इतर तपशील स्पष्ट लिहिलेला नसतो. शिवाय ब-याचदा अशा वस्तू रस्त्यावर किंवा टोलनाक्यावर विकल्या जातात. सध्या हमरस्त्यावर प्रत्येक २०-२५ किलोमीटर अंतरावर अशा प्रकारच्या पाण्याची नवी कंपनी आढळून येते. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही.

याबाबत तक्रार आली की त्यावर कारवाई करण्यापेक्षा वरचेवर अशा कंपन्यांच्या पदार्थांची तपासणी होणे आवश्यक आहे. तक्रार करणा-यांकडून शास्त्रशुद्ध नमुन्यांची अपेक्षा करणे योग्य नाही. वरील बाबीचा विचार करून अशा प्रकारचे दूषित पाणी बनवणा-या कंपन्यांवर कडक कारवाई करावी जेणेकरून कुणीही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यास धजावणार नाही. असे कुंभार यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.