Pune Crime : 64 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष महागात; 58 लाख रुपये घेऊन होणारा पती फरार

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune Crime) एका 64 वर्षीय महिलेला लग्नाचे स्वप्न पाहणे चांगलेच महागात पडले. या महिलेसोबत एकाने सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवलं आणि वेगवेगळ्या कारणाने तिच्याकडून तब्बल 57 लाख 79 हजार रुपये उकळले.
ही घटना डिसेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत घडली आहे. सायबर पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून सहा मोबाईल धारक व बँकेचे खाते धारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या गर्भश्रीमंत आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात त्या एकट्याच राहतात. त्यांची आणि आरोपीची व्हाट्सअपद्वारे ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले. त्याने इरीक ब्रॉन असे नाव सांगितले होते. तो परदेशात असल्याचेही तो म्हटला. त्यानंतर त्याने त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना लग्न करण्याचे देखील आमिष दाखविले. महिलेचा विश्वास संपादन केला व त्यानंतर त्यांना बँक खात्यात दोन करोड रुपये पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
गिफ्ट म्हणून त्याने ही रक्कम व त्यासोबत सोन व इतर वस्तूही पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर एका महिलेने त्यांना फोन केला, तसेच आरबीआय बँकेशी मिळताजुळता एक मेल पाठविला. त्यानंतर विविध कारणे देऊन त्यांना पैसे पाठविण्यास भाग पाडले. तर, त्यांना धमकावले देखील असून, काही पैसे हे भिती दाखवून उकळले आहेत. या सायबर चोरट्यांनी सहा ते सात महिन्यात महिलेकडून 57 लाख 79 हजार रुपये उकळले. सतत पैशांची मागणी होत असल्याने या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.