PCMC News: दिव्यांगांना दिवाळी भेट; सामान्य करात 50 टक्के सवलत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) करसंकलन विभागाच्या वतीने माजी सैनिकांना मिळकत कर भरण्यासाठी 50 टक्के सवलत दिली जाते. याच धर्तीवर आता दिव्यांगांनाही सामान्य करामध्ये वर्षभर सवलत देऊन दिव्यांगांना महापालिकेने दिवाळी भेट दिली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने शहरातील मालमत्तांवर कराची आकारणी व वसुली केली जाते. 20 फेब्रुवारी 2014 मध्ये 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्तेस आर्थिक वर्षातील चालू मागणीतील सामान्य करात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. मात्र, हा लाभ घ्यायचा असल्यास 30 जूनपूर्वी सवलतीची रक्कम वगळता थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरणे आवश्‍यक आहे.

मात्र, आता यापुढे दिव्यांग व्यक्तींना संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये कधीही या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाच्या दिव्यांग व्यक्तींच्या नावावर मालमत्ता (PCMC News) असल्यास त्यांना या सवलतीचा फायदा घेता येणार आहे. त्यामध्ये अंध, दिव्यांग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांपासून हे धोरण कायमस्वरूपी अमलात आणले जाणार आहे. त्यामुळे शहरातील दिव्यांगांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.

नवीन मालमत्तांवर प्रथम कर आकारणी होऊन अशा मालमत्तांना प्रथम बिल देण्यात आले आहे. त्यांना चालू आर्थिक वर्षाच्या ज्या दिनांकास बिल संगणक प्रणालीमधून येईल त्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आतमध्ये आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे. स्वतंत्र नोंद असलेल्या बिगरनिवासी वापराच्या मालमत्तेस सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 10 टक्के 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 5 टक्के सवलत देण्यात येणार आहे, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी आदी मालमत्ताधारकांना सन 2022-23 व 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 5 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.