Pune Crime News : कुख्यात गुंड गजा मारणे विरोधात वारजेतही गुन्हे दाखल, तुरुंगातून सुटल्यानंतर चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यातील आराेपी गजानन मारणे याची दाेन खूनाच्या गुन्ह्यातून न्यायालयात निर्दाेष मुक्तता झाल्यानंतर त्याची मुंबईतील तळाेजा कारागृहातून सुटका करण्यात आली. परंतु सुटका केल्यानंतर समर्थकांसह भव्य रॅली काढणे त्याला महागात बसले असून पुणे पाेलिसांनी याप्रकरणी आता वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी त्याच्यावर हिंजवडी, तळेगाव दाभाडे पाेलीस ठाणे व काेथरुड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गजा मारणे हा साेमवारी तळाेजा कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन 400 ते 500 वाहनांसह त्याने राॅयल एन्ट्री करत शक्तिप्रदर्शन केले. काेथरुड येथील गुन्ह्यात त्यास पाेलीसांनी अटक केले परंतु न्यायालयाने त्यास जामीन मंजूर करत बुधवारी मुक्तता केली. साेमवारी रात्री साडेआठ ते साडेनऊचे दरम्यान वारजे पाेलीस ठाण्याचे हद्दीत चांदणी चाैक येथे मारणे व त्याचे समर्थकांना विनापरवानगी मिरवणुक काढली. त्याचा साथीदार संताेष शेलार यास पाेलिसांनी विचारणा केली असता त्याने हाताने पाेलीस कर्मचाऱ्याला ढकलून दिले व मिरवणुक तशीच पुढे सुरु ठेवली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गजा मारणे, प्रदीप कंधारे, बापू बागल, अनंता कदम, गणेश हुंडारे, रुपेश मारणे, रुपेश बनसाेडे, श्रीकांत पवार, सचिन ताकवले, संताेष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हिंजवडी पाेलीस ठाण्यात मारणे याच्यासह 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहातून सुटल्यानंतर मारणे हा त्याचे साथीदारांसह पुण्याचे दिशेला जाताना त्याचे आजुबाजुला सुमारे 100 ते 150 समर्थकांसह 30 ते 35 चारचाकी गाडया चालवुन, गाडयाचे बाहेर प्लेटफार्मवर धाेकादायक पद्धतीने उभे राहून, गाड्यातून अर्धवट शरीर बाहेर काढून, रस्त्याने जाणारे आजुबाजुच्या वाहन चालकांना रस्त्याला कडेला हाेवुन गाड्या थांबवून सार्वजनिक रस्त्याने मुंबईकडून बंगलाेरकडे जाण्याचा त्यांचा हक्क असताना त्या हक्कापासून दहशतीचे जाेरावर वंचित ठेवुन घाेषणाबाजी करुन इतर वाहनचालकांना पुढे जाऊ न देता वाहनचालकांना शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.