Pune Crime News : दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

एमपीसीन्यूज  : सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. आतापर्यंत शहरातील 21 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 

रोशन दयानंद लोखंडे (वय 21), प्रसाद अर्जुन धावडे (वय 20),  वैभव अरुण तिडके (वय 21), पवन सुग्रीव बिराजदार (वय 24) आणि फैजल फिरोज काजी (वय 21) असे मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे  आहेत.

पुणे शहरात दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करून सामाजिक शांततेचा भंग करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, 15 फेब्रुवारी रोजी आरोपींनी नरे परिसरातील एका ऑफिसमध्ये जबरदस्तीने प्रवेश करत कोयते, चाकू, हॉकी स्टिक अशा हत्यारांचा धाक दाखवून जयंती साजरी करण्यासाठी रोख 10 हजार रुपये घेतले होते.

शिवाय सिंहगड रस्ता परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शस्त्राचा  धाक दाखवून दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान  आरोपींनी 2016 पासून अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.  सिंहगड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे, बेकायदा घातक शस्त्र, अग्निशस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपी रोशन लोखंडे याला दोन वेळा स्थानिक शहर आणि जिल्ह्यातील तडीपार करण्यात आले होते. असे  असतानाही आरोपींनी  वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते.

त्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी मांडला होता. त्यानुसार त्या सर्व आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे यांनी परवानगी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.