Pune Crime News : महिलांच्या गळयातील दागिने हिसकावणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांविरुध्द मोक्का

एमपीसी न्यूज – महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या जवळून 85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अली अकबर हुसेन इराणी (वय 30, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती जुना पुणे-मुंबई रोड शिवाजी नगर) व त्याचा साथीदार हैदर अली अब्बास अली सिया (वय 30, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 62 वर्षीय महिला 18 जानेवारी 2021 रोजी सूस रोड, पाषाण येथून जात असताना दुचाकी गाडीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरली. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना मिळालेल्या बातमीवरुन पोलीसांनी सापळा लावला व दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या जवळून 85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक आरोपी पोलीस अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार आहेत त्यांच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न व फसवणूक यासारखे गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत‌. तसेच, त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.