Pune Crime News : मसाले व्यावसायिकाच्या गाडीतील 97 लाख रुपये घेऊन चालकाचा पोबारा

एमपीसी न्यूज – पुण्यातील कल्याणीनगर परिसरातून एका मसाले व्यावसायिकाच्या गाडीतून 97 लाख रुपये घेऊन चालकाने पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्यावसायिक लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरला होता. हीच संधी साधून चालकाने गाडीत असणारी रोख रक्कम सोडून पळ काढला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.

मार्केट यार्ड मधील एका 50 वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली असून त्यानुसार कारचालक विजय माधव हलगुंडे (वय 22, रा. कात्रजकोंढवा रोड) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे व्यवसायिक असून मार्केट यार्ड परिसरात त्यांचा सुखामेवा व मसाल्याचे पदार्थ होलसेल विक्री करण्याचा व्यवसाय आहे. मूळचे हरियाणा येथील असलेले हे व्यावसायिक दररोज जमा झालेली रक्कम ते बँक खात्यावर टाकत असत. परंतु, गेल्या एक महिन्यांची रोकड त्यांनी बँकेत भरणा केली नव्हती. त्यातच त्यांना मुळगावी जायचे होते. त्यामुळे त्यांनी जमलेली 97 लाख रुपयांची रोकड बॅगेत भरून नातेवाईकांकडे देण्याचे ठरविले.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते रोख रक्कम घेऊन नातेवाईकांना देण्यासाठी निघाले होते. गाडी विजय हलगुंडे चालवत होता. सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कोरेगाव पार्क परिसरातुन कल्याणी नगरच्या दिशेने जात असताना त्यांनी लघुशंका आल्याने कार बाजूला घेण्यास सांगितली. विजयने कार बाजूला घेतल्यानंतर तक्रारदार हे लघुशंका करण्यास गेले. त्यांनी रोकड असलेली पिशवी कारमध्येच ठेवली होती. तीच संधी साधत विजयने कारसह रोकड घेऊन पोबारा केला.

लघुशंकाकरून पाठिमागे पाहिल्यानंतर तक्रारदारांना कार नसल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच एका दुचाकीस्वार महिलेची मदत घेऊन त्यांच्यासोबत कारचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना काही अंतरावर कार दिसून आली. मात्र, कारमध्ये पैसे अन चालक नसल्याचे दिसले. त्यावेळी त्यांना चालकाने पैसे घेऊन पळ काढल्याची समजले. त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रविंद्र आळेकर हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.