Pune Crime News : पुण्यातील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा भोवला, तडकाफडकी बदली

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याची खून झाल्यानंतर सहकारनगर परिसरातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत 200 हून अधिक जण दुचाकीवरून सहभागी झाले होते. सहकारनगर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत, गुन्हे निरीक्षक राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. तर गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 15 मे च्या मध्यरात्री बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाला. त्यानंतर सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या घरापासून वाघाटे याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. मोठ्या संख्येने वाघाटे याचे समर्थक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंतयात्रेचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर सर्व बाजूने टीका होऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक होत या प्रकरणी 200 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. आतापर्यंत या तीनशे सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 50 हून अधिक दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. तर यातील उर्वरित आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.