Pune : चंद्रकांत पाटील यांची मागणी बिल्डर धार्जिणी : गोपाळ तिवारी

Demand of Chandrakant Patil in fevour of Builder : Gopal Tiwari

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील 9 मीटर रुंदीच्या रस्त्यावरील मिळकतींवर – प्लॉटवर विकसकास अतिरिक्त टीडीआर देण्याबाबत परवानगी द्या, असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. वास्तविक हे कृत्य सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण विरोधी असून बिल्डर धार्जिणे असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.

पुणे हे सिमेंटचे जंगल करायचे नाही. अशा प्रकारे अतिरिक्त टीडीआर 9 मीटर रस्त्यावरील प्लॉट – मिळकतींवर मंजूर करू नये. सध्या कोरोनाचा अनुभव लक्षात घेतला तर अतिरिक्त टीडीआर देऊन इमारतीची उंची नाहक वाढवून, तिथे रहिवासी संख्या वाढविणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

याबाबत एकतर्फी निर्णय घेऊ नये, असे पत्र गोपाळ तिवारी यांनीही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे. महापालिका सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणू विरोधी लढा देत आहे. दाट व विरळ वस्तीमधील संसर्गजन्य रोग वाढत आहे.

जिथे दाट वस्ती आहे, लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही. तिथे संसर्ग लवकर बळावतो आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेता यापुढे शहराचा विस्तार हा उंचीजन्य नव्हे तर आडव्या विस्तारित पध्दतीने करावा लागेल, असेही तिवारी यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रश्नासंदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांची लवकरच भेट घेणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.