Pune : तृतीयपंथी व्यक्तींच्या विशेष शिबिरात 64 प्रमाणपत्राचे वाटप 

एमपीसी न्यूज – सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा ( Pune)  विधी सेवा प्राधिकरण व युवा विकास व उपक्रम केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एच. व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुधवार पेठ, पुणे येथे तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र नोंदणीबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 64  तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, युवा विकास व उपक्रम केंद्राचे संचालक निला काळे, केंद्राच्या एलजीबीटीक्यूआयए प्लसप्लस विभागाचे विभागप्रमुख प्रितेश कांबळे आदी उपस्थित होते. 

तृतीयपंथी प्रमाणपत्र व ओळखपत्राच्या सहाय्याने तृतीयपंथीय व्यक्तींना शिधा पत्रिका, आधार कार्ड, पेन्शन योजनेचा लाभ, रहिवासी दाखला व मतदान कार्ड अशा अनेक शासकिय योजनांचा लाभ मिळवणे सोयीचे होईल. नोंदणी झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला पुरविण्यात येणार असल्यामुळे तृतीयपंथी समुदायाला भविष्यात काम करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे सांगून समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष शिबीरांचा तृतीयपंथीय व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त लोंढे यांनी केले.
कांबळे यांनी पारलिंगी व्यक्तींना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पारलिंगी प्रमाणपत्र व ओळखपत्र आवश्यक असल्याचे सांगितले. काळे यांनी समाज कल्याण विभाग आणि युवा विकास व उपक्रम केंद्रामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांत तृतीयपंथीय व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन ( Pune) केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.