Pune: सामान्यांना आरोग्यसुविधा कमी पडू देऊ नका- ‘रिपाइं’ची मागणी

Don't let the common man lack health facilities - RPI कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

एमपीसी न्यूज – मार्चपासून कोरोनाशी लढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 200 ते 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, कोरोना आटोक्यात आलेला नाही. शिवाय, कोरोनाबधितांना वेळेवर उपचार न मिळणे, बेड, व्हेंटिलेटर न मिळणे, उपचारांअभावी रुग्ण तडफडून मरणे आदी घटना घडत आहेत.

महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून सामान्यांना वेळीच आरोग्यसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने करण्यात आली. यासह कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव व शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना शुक्रवारी निवेदन दिले. यावेळी ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, पालिकेतील गटनेत्या नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे, मोहन जगताप, श्याम सदाफुले आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउननंतर शिथिलता देण्यात आली. दुकानदार, व्यापारी आणि ग्राहकाकडून या शिथिलतेचा गैरवापर केला गेला. परिणामी, संसर्ग वाढत गेला. त्यामुळे आता दुकाने सुरू करताना दुकानदार व व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करावी, महापालिका रुग्णालयात व्हेंटिलेटर वाढवावेत, परवानाधारक पथारी व्यावसायिकांना परवानगी द्यावी, कोरोना रुग्णावरील उपचारात हलगर्जीपणा करू नये, पालिकेत येणाऱ्यांची थर्मामिटर तपासणी व सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करावा, अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत.

आयुक्तांकडून आश्वासन

दरम्यान, ‘रिपाइं’ने दिलेल्या निवेदनावर चर्चा करून या मागण्या विचाराधीन असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. औरंगाबाद पॅटर्ननुसार सर्व व्यापाऱ्यांच्या व दुकानदार यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे पत्रक २६ जुलैला काढणार असल्याचे सांगितले. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ८०० बेडचे कोविड रुग्णालय उभारणार असून, त्यात २०० व्हेंटिलेटर, तर ६०० ऑक्सिजन बेडचा समावेश असणार आहे. याशिवाय कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जात असल्याचे आश्वासन आयुक्तांनी ‘रिपाइं’च्या शिष्टमंडळाला दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.