Pune : कामावरून घरी जाताना अग्निशमन अधिकारी अन् जवानाने विझवली आग

एमपीसी न्यूज – पुण्यात काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी, भेकराईनगर येथील सुरज हार्डवेअर या दुकानामध्ये आग लागल्याची घटना घडली होती. हार्डवेअरचे दुकान रात्री बंद झाले होते. परंतू आत दुकानामधल्या साहित्याने पेट घेतला होता व नागरिक अग्निशमन दलाला कळवून मदतीची वाट पाहत होते.

त्याचवेळी कोंढवा अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड व फायरमन संदीप जगताप हे दुपारची आपली ड्युटी संपवून घरी जाताना त्यांनी नागरिकांची गर्दी पाहून आगीची घटना पाहिली. या दोन जवानांनी क्षणातच आग लागलेल्या दुकानाकडे धाव घेऊन तिथे मिळालेल्या घन व पहार याच्या सहाय्याने दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न करत व दुकानाच्या मागील बाजूस असणारया जागेतून तिथे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.

दुकानामध्ये पेंट तयार करण्याचे मशिन, कंप्युटर व इतर साहित्याने पेट घेतला असल्याचे त्यांना समजले. आगीची तीव्रता कमी होतेय तोपर्यंत हडपसर अग्निशमन केंद्रातील जवान ही पोहचले व त्यांनी पुढे पाण्याचा मारा करत आग विझवली. अधिकारी गायकवाड व फायरमन जगताप यांनी केलेल्या त्यांच्या कर्तव्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

तिथे असलेल्या नागरिक व दुकानाच्या मालकाने अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड व फायरमन संदीप जगताप यांचे आभार मानले. या कामगिरीमध्ये जवान नारायण जगताप, झगडे, आडाळगे व विजय चव्हाण यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.