Pune: फ्लॅटचे हप्ते थकले, त्यात शेजारणींचे टोमणे, तणावातून विवाहितेची आत्महत्या

Pune: Unpaid installments of Flat, neighbors scolded, married woman commits suicide due to stress आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोन शेजारणींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद आणि त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वैशाली राऊळ (वय 30) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित महिलेच्या पतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द येथील सृष्टीलेक अपार्टमेंटमध्ये ही महिला पतीसह राहत होती. पती रिक्षाचालक तर मयत महिला ब्युटी पार्लर चालवत होती. तीन वर्षांपूर्वी त्यांनी सृष्टीलेक अपार्टमेंटमध्येच फ्लॅट घेतला होता. दरम्यान अचानक लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे रिक्षा थांबली, ब्युटी पार्लरही चालनासे झाले. परिणामी घराचे हप्तेही थकले होते.

आरोपी महिला वैशाली राऊळ यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना टोमणे मारीत होत्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी (14 जून) या दोन महिलांचे आणि फिर्यादीच्या पत्नीचे याच कारणावरून भांडण झाले. यावेळी या दोन महिलांनी वैशाली राऊळ यांना फ्लॅटचा हप्ता भरू शकत नाही, तुझ्या घरी कुणीतरी येते. असा आरोप करत तिच्या चारित्र्यावर संशय घेत अश्लील आरोप केले.

चारित्र्यावर संशय घेतल्याचा धक्का वैशाली यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान फिर्यादी महिलेच्या पतीने या धक्क्यातून सावरल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

त्यानुसार दोन महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.