Pune : माजी आमदार वसंततात्या थोरात यांचे निधन

एमपीसी न्यूज- माजी आमदार आणि अखिल मंडई मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंततात्या थोरात (वय 77) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. आज दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे.

वसंततात्या थोरात हे अखिल मंडई मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने युद्ध आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये भरीव सहभाग घेतला आहे. वसंततात्या थोरात यांनी काहीकाळ काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदाची धुरा वाहिली. 1974-75 या वर्षात त्यांनी पुण्याचे महापौरपद सांभाळले. 1991 मध्ये त्यांची आमदार म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे त्यांनी आणीबाणीच्या काळात 1977 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती.

वसंततात्या थोरात यांनी विविध पदे भूषवली आहेत. शिवाजी मराठा सोसायटीचे ते मानद सचिव होते. तर अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे माजी खजिनदार होते. सद्गुरू शंकरमहाराज ट्रस्टचे ते माजी विश्वस्त तर बदामी हौद संघाचे ते माजी अध्यक्ष होते. भारतामध्ये प्रथमच महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा मान थोरात यांच्याकडे जातो. त्याचप्रमाणे 1972 मध्ये महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 1974 मध्ये 50 पैशात झुणका भाकर ही योजना त्यांनी पुण्यात सुरु केली. सामाजिक सलोखा राखण्याच्या बाबतीत अण्णांचा शब्द अंतिम मानला जात असे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.