Pune : आरती अंकलीकर यांच्या ‘ विरासत ‘ मैफलीने रसिक मंत्रमुग्ध

'डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल 'मध्ये शास्त्रीय , सुगम गायनाने बहार

एमपीसी न्यूज- बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरु असलेल्या ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल ‘च्या पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ‘विरासत-हेरिटेज ऑफ इंडियन म्युझिक ‘ या मैफलीत ख्यातनाम शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांच्या शास्त्रीय, सुगम गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

31 जानेवारी रोजी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतर शेवटच्या सत्रात आरती अंकलीकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले आणि श्रोत्यांची मने जिंकली. अंकलीकर यांनी ‘ जाओ सैय्या ‘, ‘देर ना लगाओ प्रितम प्यारे ‘ यासह बागेश्री रागातील चार रचना सादर केल्या. या रचनेसह अनेक बहारदार शास्त्रीय रचना त्यांनी सादर केल्या. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले.

‘झुला’ हा उपशास्त्रीय गायन प्रकारही त्यांनी सादर केला. ‘आओ सब सखीयन झुलन बंधाओ’ असे शब्द होते. गुरु शोभा गुर्टू यांनी शिकवलेली ‘शम्मा मेहफिल ही नही’ ही गझल देखील त्यांनी सादर केली. ‘कजरी’ हा विराणी प्रकारातील लोकगीतासारखा भासणारा गायन प्रकार दाद मिळवून गेला. ‘बरसन लागे बदरीया, रुम झूम के ‘ असे शब्द होते.

‘सरदारी बेगम ‘ चित्रपटामधील ‘ हुसेन जब के चले ‘ हा कलमा आणि जावेद यांची ‘ होरी ‘ त्यांनी सादर केली. ‘ मोरे कान्हा जब आये पलटके, अब होली मै खेलू डटके ‘ असे शब्द होते. कवी नितीन आखवे यांनी लिहिलेली, श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली रचना ‘ मी राधिका ‘ ही रचना मैफलीचा कळसाध्याय ठरली. ‘ अवघा रंग एक झाला ‘ या अभंगाने सांगता झाली.

चैतन्य कुंटे ( संवादिनी ), विभव खांडोळकर ( तबला ), सुजीत लोहोर ( पखवाज ), अबोली गद्रे, सरगम, स्वरुपा बर्वे, ( गायन ) , संगीत मिश्रा ( सारंगी ), यांनी साथसंगत केली.प्रशांत कांबळें यांनी ध्वनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.