Pune : लोणावळा-पुणे दरम्यानची एक लोकल सेमी फास्ट

एमपीसी न्यूज – लोणावळा रेल्वे स्थानकावरून रात्री 10.35 वाजता निघणारी लोकल सोमवार (दि. 3) पासून सेमी फास्ट करण्याचा निर्णय पुणे रेल्वे मंडळाने घेतला आहे. ही गाडी लोणावळा पुणे दरम्यानच्या पाच स्थानकांवर थांबणार नाही. यामुळे ही लोकल अर्धा तास अगोदर पोहोचणार आहे. यामुळे दौंड, सोलापूर, वाडी, चेन्नई, तसेच सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूरकडे जाणा-या प्रवाशांना वेळेत रेल्वे मिळणार आहे. हा बदल प्रायोगिक तत्वावर 3 ते 17 डिसेंबर या कालावधीत लागू करण्यात आला आहे.

लोणावळा-पुणे लोकल (99833) प्रायोगिक तत्वावर सेमी फास्ट करण्यात आली आहे. ही लोकल मळवली, वडगाव, घोरावाडी, बेगडेवाडी आणि खडकी स्थानकांवर थांबणार नाही. या गाडीमध्ये एकूण सुमारे 60-70 प्रवासी प्रवास करतात. ही लोकल यापूर्वी मध्यरात्री 12.20 वाजता पुणे स्थानकावर पोहोचत आहे. यामुळे दौंड, सोलापूर, वाडी, चेन्नई कडे जाणा-या प्रवाशांना दादर मद्रास एक्सप्रेस तसेच सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूरकडे जाणा-या प्रवाशांना महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी मिळत नव्हती.

प्रवाशांनी याबाबत रेल्वे मंडळाकडे याबाबत तक्रार केली. त्यावर रेल्वे प्रशासनाने लोणावळा पुणे लोकल (99833) अर्धा तास अगोदर आणण्याचा निर्णय घेत पाच स्थानकांवरील थांबा रद्द करून या लोकलला सेमी फास्ट बनवले आहे. आता ही लोकल 10.35 वाजता लोणावळा स्थानकावरून निघून 11.50 वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. गैरसोय होणा-या प्रवाशांसाठी लोणावळा स्थानकावरून 11.40 वाजता निघणा-या लोकलने प्रवास करता येईल.

लोणावळा-पुणे लोकल (99833) पुढील 15 दिवस रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची वेळ –
लोणावळा – 10.35
कामशेत – 10.49
कान्हे – 10.53
तळेगांव – 11.02
देहुरोड – 11.12
आकुर्डी – 11.17
चिंचवड – 11.21
पिंपरी – 11.25
कासारवाडी – 11.29
दापोडी – 11.33
शिवाजीनगर – 11.41
पुणे – 11.50

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.