Pune : माझं चारित्र्यहनन करण्यात ‘मराठा समाज’ आघाडीवर -तृप्ती देसाई

0

एमपीसी न्यूज – मला ट्रोल करणारे आणि अश्लील शिव्या देणारे, आईवरून शिव्या देणारे, माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण आहेत. मी पण मराठ्यांचीच लेक आणि सून आहे. छत्रपतींची शिकवण मराठे विसरायला लागलेत हे यावरूनच लक्षात आले. त्यामुळे माझं चारित्र्यहनन करण्यात मराठा समाज आघाडीवर आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ‘फेसबुकवर पोस्ट’द्वारे म्हटले आहे.

‘फेसबुकवर पोस्ट’द्वारे तृप्ती देसाई पुढे म्हणतात, जी महिला सामाजिक काम करते. एखाद्या विषयावर आवाज उठवते, तिला ट्रोल करायचं, तिची आणि त्यांची कधी भेट ही झालेली नसते. तरी तिच्या विषयी माहीत नसलेल्या खोट्या गोष्टी शेअर करून तिची बदनामी करायची, चारित्र्यहनन करायचे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्यात आघाडीवर मराठा समाज आहे.

मला हे कधी लिहायचं नव्हतं कारण मराठ्यांची बदनामी होईल म्हणून, पण लिहावं लागतंय. कारण ,छत्रपतींची शिकवण मराठा विसरायला लागलेत आणि आपल्याच आई, बहिणीला शिव्या द्यायला लागलेत. या शिव्या मला आलेल्या आहेत म्हणून मी लिहिल्या आहे.

माझी एखादी गोष्ट पटली नाही तर नक्कीच विरोध झाला पाहिजे. परंतु एखाद्या महिलेला इतका त्रास द्यायचा. इतके बदनाम करायचे की तिने आत्महत्या केली पाहिजे, असे सध्या सोशल मीडियावर लोक उपलब्ध आहेत. ती महिला कोणाची तरी मुलगी आहे, बहिण आहे, आई आहे, सून आहे हे सुद्धा विसरायला लागले आहेत. अनेकांनी मला बदनाम केले, परंतु या सगळ्यात जास्त ‘मराठा समाज’ अग्रेसर होता आणि आहे.

खूप वाईट वाटले की राजमाता जिजाऊंचा प्रोफाइल पिक्चर लावून छत्रपती शिवरायांचा प्रोफाईल पिक्चर लावून, छत्रपती संभाजी राजांचा प्रोफाइल पिक्चर स्वतःच्या फेसबूक अकाउंटवर लावून मला घाणेरड्या शिव्या, चारित्र्यहनन करण्यात आले. त्या सर्वांचे स्क्रीनशॉट माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि माझी सगळ्यात जास्त बदनामी करणारे फेसबुकवर कुठले ग्रुप होते, तर ते एक करोड मराठ्यांचा ग्रुप, शिवप्रेमी असे अनेक ग्रुप होते.

आज मला खूप वाईट वाटतंय गेल्या एक महिन्यापासून हे सर्व माझी बदनामी करत आहेत. परंतु आजपर्यंत मी मराठा समाजाची आहे, हा मला अभिमान होता. पण, आज देवाने मला मराठा समाजात का जन्माला घातले? जिथे महिलेचा सन्मान केला जात नाही असा प्रश्न मला पडलाय?

जितेंद्र राऊतने महाराणी येसूबाईंविषयी एक वाक्य अपमानास्पद लिहिले, शिवी दिली ते नक्कीच चुकीचे होते त्याचा निषेधच आहे. पण, जितेंद्र राऊतवर पिसाळून त्याच्या अंगावर जाणारे मराठे जेव्हा मला अशाच शिव्या देत आहेत, चारित्र्यहनन करत होते, जे माझे नाहीत, असे घाणेरडे फोटो शेअर करत होते तेव्हा मी पण त्यांचा जितेंद्र राऊत करणे अपेक्षित होते का किंवा आहे का?. याचे उत्तर मला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांनी दिले तर बरं होईल.

ज्या मराठ्यांचा इतिहास सगळीकडे सांगितला जातो, आमच्या राजाने महिलांना कशी इज्जत द्यावी?, परस्त्री ही मातेसमान आहे हे शिकविले…. छत्रपती शिवाजी महाराजांना मला आज सांगायचं आहे, महाराज तुम्ही जिथे कुठे असाल तिथून नक्कीच हे पहात असाल .

तुमचे मावळे तुमचा फोटो प्रोफाइल पिक्चर ठेवून आज माझ्या सारख्या महिलेला घाणेरड्या शिव्या देत आहेत, मी चांगले काम करत असताना मला बदनाम करीत आहेत, अशांना तुमचे मावळे तरी कसे म्हणायचे?… महाराज, मला खूप अभिमान आहे कि मी छत्रपतींची लेक आहे परंतु आज कुठेतरी लाज वाटते सांगायला की “मी मराठा आहे”.

महाराज आज आपण पाहिजे होतात, आज नक्कीच एक लढवय्या स्त्री म्हणून माझा सन्मान नक्कीच आपण केला असतात आणि अशा तरुणांचे जे महिलांचा अपमान, चारित्र्यहनन करतात त्यांना तुमच्या पद्धतीने शिक्षा केली असती, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like